संत निरंकारी मिशनतर्फे ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ अभियानाच्या चौथ्या टप्प्याचा रविवारी प्रारंभ
पिंपरी, ता. २१ - संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘अमृत’ प्रकल्पांतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचा प्रारंभ रविवार (ता. २२) सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत, परम श्रद्धेय निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतभर एकाच वेळी करण्यात येणार आहे. यामध्ये समूह गायन, जनजागृती चर्चासत्रे आणि सोशल मीडिया द्वारे जलजन्य आजार आणि स्वच्छतेचे महत्व अधोरेखित केले जाणार आहे.
‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी, मुळा, मुठा, भीमा, भामा, घोडनदी, पवना, वेळू, कुकरी, मिना, कऱ्हा, मांडवी, आनंदी या नद्यांसह शहरातील विविध तलाव अशा ४२ ठिकाणी मोहीम राबविण्यात येणार आहे. संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय जोगिंदर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले की, ''हा विशाल उपक्रम देशभरातील १५०० हून अधिक ठिकाणी एकाच वेळी आयोजित केला जाईल. या महामोहिमेचे हे अभूतपूर्व प्रमाण या मोहिमेला ऐतिहासिक स्वरूप देईल, ज्यामुळे जलसंधारण आणि स्वच्छतेचा संदेश अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचेल.''
पाणी हे केवळ एक साधन नसून जीवनाचा आधार आणि ईश्वराची अमूल्य देणगी आहे त्याचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे नैतिक कर्तव्य आहे, ही जागृती समाजामध्ये निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. संत निरंकारी मिशनने सदगुरु बाबा हरदेव सिंह जी यांच्या प्रेरणादायी शिकवणी आत्मसात करून सन २०२३ मध्ये संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने ‘प्रोजेक्ट अमृत’ची सुरुवात केली होती. जलसंवर्धन हा उपक्रम केवळ एखाद्या दिवसापुरता किंवा मर्यादित मोहिमेपुरता न ठेवता तो एक जीवनशैली, संस्कार आणि सेवाभाव म्हणून स्वीकारण्याची प्रेरणा बनेल. जिथे स्वच्छ जलातून स्वच्छ मन आणि स्वच्छ समाज घडू शकेल.
नद्या, तलाव, सरोवरे, विहिरी व झरे अशा नैसर्गिक जलस्रोतांच्या संरक्षणासाठी समर्पित या जनआंदोलनाने आपल्या पहिल्या तीन टप्प्यांत सेवा, समर्पण व सहभागाचे उत्कृष्ट उदाहरण निर्माण केले आहे. याच यशामुळे प्रेरित होऊन हा चौथा टप्पा अधिक व्यापक, संघटित व दूरदृष्टीपूर्ण स्वरूपात राबविला जात आहे.