'काला घोडा फेस्टिव्हल' मध्ये महापालिकेच्या शाळेने पटकवला... प्रथम क्रमांक
थेरगाव मनपा शाळेने सादर केलेला “मानवी विचारांचे रोलरकोस्टर” या प्रकल्प ठरला लक्षवेधी
पिंपरी, ता. ३ - मुंबईमध्ये झालेल्या प्रसिद्ध काला घोडा फेस्टिव्हल - २०२६ अंतर्गत आयोजित चिल्ड्रन्स इन्स्टॉलेशन विभागासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चार शाळांची निवड झाली होती. या विभागातील विजेत्या शाळांची नावे नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण प्राथमिक कन्या शाळेने प्रथम क्रमांक पटकवला. काला घोडा फेस्टिव्हलमध्ये पहिल्यांदाच महापालिकेच्या शाळेला प्रथम पारितोषिक मिळाले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त ममता शिंदे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर तसेच कला नोडल अधिकारी श्रीकांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. थेरगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी “मानवी विचारांचे रोलरकोस्टर” या विषयावर सादर केलेले इन्स्टॉलेशन प्रभावी ठरले. या प्रकल्पामध्ये टाकाऊ वस्तूंचा सर्जनशील वापर करून मानवी मनाचा वेग, भावनांची गुंतागुंत आणि आत्मसंयम यांचे प्रभावी प्रतीकात्मक दर्शन घडवण्यात आले आहे.
हा प्रकल्प सर्वोत्तम ठरला असून थेरगाव शाळेला प्रथम क्रमांक मिळाला आहे. या यशामुळे मनपा शाळांनी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रासह विविध राज्यांतील अनेक नामांकित व खासगी शाळांनी सहभाग नोंदवला होता. अशा स्पर्धात्मक वातावरणात महापालिकेच्या शाळेने मिळवलेले हे यश महापालिका शाळांमधील अध्यापनाची व अध्ययनाची उत्तम गुणवत्ता दाखवून जाते.
सादर केलेल्या प्रकल्पाची (इन्स्टॉलेशनची) संकल्पना व निर्मिती कला शिक्षिका मुक्ता पुसाळकर-धोंगडे यांची होती. त्यांना अंशकालीन शिक्षिका स्वाती मदने व दिपाली नवले यांचे सहकार्य लाभले. या प्रकल्पात सानिका पवार, श्रावणी महापुरे, दिपाली पांडगुळे, अनुजा टोमके, प्रिया होळकर, हुमेरा शेख, यशोदा राठोड, किशोरी वाबळे व समिक्षा डींगरे या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये मिळालेल्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी दौंडकर यांच्यासह शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.
असा होता प्रकल्प.....
‘मानवी विचारांचे रोलरकोस्टर’ या संकल्पनेवर आधारित इन्स्टॉलेशनची कलात्मक मांडणी, प्रतीकात्मकता आणि भावनिक आशयामुळे परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये सायकलच्या चाकांमध्ये धावणारा घोडा विचारांची ऊर्जा आणि इच्छाशक्ती दर्शवतो, तर दोरी पकडून उभी असलेली मुलगी आत्मसंयम आणि विवेकाचे प्रतीक ठरते. वेस्ट मटेरियलमधून घडवलेले चेहरे, मानवी आकृती आणि त्रिमितीय रचना जीवनातील संघर्ष, अनुभव आणि मानसिक चढ-उतार अधोरेखित करतात. विचारांवर नियंत्रण ठेवून अनुभवांना योग्य दिशा देण्याचा संदेश देणाऱ्या या इन्स्टॉलेशनमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धेत मानांकन मिळाले असून, त्यांच्या सर्जनशीलतेने राष्ट्रीय स्तरावर कौतुकास पात्र ठरले आहे.
अभिमानाची बाब
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांची कल्पकता, मेहनत आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले आहे. महापालिकेच्या शाळांमधील गुणवत्ता आणि संधी योग्य दिशेने दिल्यास विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देखील सहज यश मिळवू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
– विक्रांत बगाडे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
विद्यार्थ्यांना नवनवीन संधी मिळतील
काला घोडा फेस्टिव्हलसारख्या प्रतिष्ठित स्पर्धेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम पारितोषिक मिळणे ही ऐतिहासिक बाब आहे. विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंमधून साकारलेली कलाकृती ही त्यांच्या विचारक्षमतेची आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोनाची साक्ष देणारी आहे. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अशा संधी देत राहणार असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण विभाग सातत्याने प्रयत्नशील राहील.
– ममता शिंदे, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका