'गॅजेट फ्री अवर्स' संस्थेने लहान-मोठ्यांना दिला पारंपरिक खेळांचा आनंद
पिपरी, ता. ५ - 'गॅजेट फ्री अवर्स' संस्थेच्या पुढाकाराने संत तुकारामनगर येथील पंडित दिनदयाळ उपाध्याय शाळेत घेतलेल्या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी मनमुराद खेळण्याचा आनंद घेतला. लहानांसोबत मोठ्यांनीही पारंपरिक खेळ खेळून पुन्हा एकदा बालपण अनुभवले.
आज मोठे लहान सर्वजणच मोबाईल फोनमध्ये व्यस्त झालेले आहेत. मोबाईल, टिव्ही, संगणक या तंत्रज्ञानाचा मर्यादित वापराचा संदेश देण्यासाठी गॅजेट फ्री अवर्स या संस्थेने पारंपरिक खेळांचा उपक्रम राबवला. या उपक्रमात डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सैनिक, राजकारणी अशा विविध क्षेत्रातील नागरिकांनी पुन्हा लहान होऊन भोवरा, गोट्या, विटी-दांडू, कबड्डी यांसारखे पारंपरिक खेळ खेळले.
महत्वाचे म्हणजे, एकूण ५०० शालेय विद्यार्थ्यांनी एकाच वेळी ५०० फुटबॉल किक मारण्याची कामगिरी केली. या कामगिरीबद्दल गॅजेट फ्री अवर्स संस्थेला प्रमाणपत्र, पदके व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. सर्व मुलांना फुटबॉल भेट देण्यात आले.