आंतरशालेय 'महापौर चषक टी-२० क्रिकेट' स्पर्धा पुन्हा सुरु करावी, भारतीय जनता युवा मोर्चाची मागणी
पिंपरी, ता. ११ - पिंपरी-चिंचवड शहरातील शालेय स्तरावरील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे यासाठी ‘आंतरशालेय महापौर चषक टी-२० क्रिकेट’ स्पर्धा पुन्हा आयोजित करण्याची मागणी भाजप युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात महापौर रवी लांडगे, क्रीडा सभापती कैलास कुटे आणि अतिरिक्त आयुक्तांना भेटून लेखी निवेदन देण्यात आले.
पिंपरी-चिंचवड शहराला क्रीडा क्षेत्राचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. शहरातील शालेय विद्यार्थ्यांमधील सुप्त क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी महानगरपालिकेतर्फे ‘आंतरशालेय महापौर चषक टी-२०’ स्पर्धा मोठ्या उत्साहात आयोजित केली जात होती. या स्पर्धेमुळे अनेक उदयोन्मुख खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळत होती. मात्र २०१९ नंतर ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली नाही. त्यामुळे शालेय स्तरावरील खेळाडूंमध्ये निराशा पसरली असून त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळत नसल्याची भावना व्यक्त होत आहे.
या निवेदनाद्वारे ही स्पर्धा पुन्हा सुरु करून तिचे व्यापक नियोजन करावे, शहरातील सर्व खाजगी व महानगरपालिका शाळांना सहभागी करून स्पर्धेची व्याप्ती वाढवावी. खेळाडूंना उत्तम दर्जाची मैदाने, पिण्याचे पाणी आणि आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय गुणवंत खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देणे आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना प्रोत्साहनपर मानधन देण्याची मागणीही करण्यात आली.
शालेय वयातच विद्यार्थ्यांना खेळाची गोडी लागल्यास भविष्यात शहरातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडू शकतील. त्यामुळे प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती शिष्टमंडळाने केली.
यावेळी, भाजप युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष दिनेश यादव, युवा मोर्चा प्रदेश सचिव अजित कुलथे यांच्यासह प्रसाद कस्पटे, दिनेश काटे, राहुल खाडे, साची दोशी, राजेश डोंगरे, मनोज घोडेकर, अजय भोंडवे, जालिंदर काटे, मयूर काळभोर, गौरव शिरुडे, हेमंत देवकुळे, शरद भालेकर, आशिष राऊत, कृष्णा कदम, अभिजीत बागुल, अजय मोरे, सचिन उदागे, नितीन साळी, राजेश चौधरी, प्रतीक रामगुडे, ऋषिकेश भालेकर, प्रदीप पवार, शंतनु चौधरी, साईराज भालेकर, ओंकार पवार, प्रतिक तळेकर उपस्थित होते.