पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून विद्यार्थ्यांमध्ये नशामुक्तीबाबत जागृती
जागतिक महिला दिनानिमित्त नशामुक्त 'समाजासाठी महिलांची भुमिका' या विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी, ता. ११ - जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड पोलिसांतर्फे आयोजित 'नशामुक्त समाजासाठी महिलांची भूमिका' या विशेष जनजागृती कार्यक्रमात चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयातील सुमारे २०० विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांना व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत माहिती देण्यात आली.
सामाजिक कार्यकर्त्या तथा महिला उद्योजिका राजश्री गागरे यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना समाजात बदल घडवण्यासाठी स्त्रीशक्तीची भूमिका खूप महत्त्वाची आहे. ''प्रत्येक घरातील स्त्री कुटुंबातील सदस्यांना योग्य मार्ग दाखवू शकते आणि कुटुंबातील सदस्यांना व्यसनापासून दूर ठेवू शकते. महिलांनी समाजात व्यसनमुक्तीबाबत जागृती करण्यासाठी पुढे आले पाहिजे.'', असे गागरे म्हणाल्या.
मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नेहा कोडे यांनी व्यसनाच्या आहारी गेल्यास होणाऱ्या शारिरीक व मानसिक दुष्परिणामांची माहिती दिली. व्यसनमुक्ती समुपदेशक विल्यम साळवी यांनी मित्रांचा दबाव, तणाव, नैराश्य किंवा चुकीचे आकर्षण यामुळे व्यसनाची सुरूवात होते. चांगल्या सवयी, सकारात्मक विचार आणि योग्य मार्गाने चालण्याच्या निर्णयामुळे तुमचे भविष्य उज्वल होईल, असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट - २ चे सहाय्यक पोलिस आयुक्त प्रवीण मोरे यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना व्यसनाच्या दुष्परिणामाबाबत सांगितले. ते म्हणाले, ''अनेक गुन्हे व कौटुंबिक समस्या या व्यसनामुळे घडताना दिसुन येत असुन व्यसनमुक्त समाज निर्माण करणे ही काळाची गरज आहे. तरुणांनी आपली ऊर्जा, वेळ आणि क्षमता चांगल्या कामासाठी वापरली पाहिजे. शिक्षण, कौशल्य आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर आपण स्वतःचे आणि देशाचे भविष्य घडवू शकतो. तसेच निरोगी जीवनशैली स्विकारुन शिक्षण, क्रीडा आणि चांगल्या सवयींमध्ये स्वतःला गुंतवा.''
पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, गुन्हे शाखा युनिट - २ चे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. आपापल्या परिसरात अंमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास अंमली पदार्थ विरोधी पथकाचा मोबाईल क्रमांक - ८६००००२३२० यावर संपर्क साधावा किंवा तात्काळ जवळील पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आपली ओळख गोपनिय ठेवण्यात येईल, असे आवाहन यावेळी करण्यात आले.