''जॉगर्स पार्क'मधील अनधिकृत बांधकाम प्रशासनाने हटवावे, अन्यथा आंदोलन तीव्र करुन आम्ही ते हटवू'
''जॉगर्स पार्क'मधील अनधिकृत बांधकाम प्रशासनाने हटवावे, अन्यथा आंदोलन तीव्र करुन आम्ही ते हटवू'
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची भूमिका, जॉगर्स पार्कमध्ये आंदोलन
पिंपरी, ता. १९ - ''प्रभाग क्रमांक ११ मध्ये जॉगर्स पार्क उद्यानात माजी महापौर मंगला कदम यांच्या पुढाकारातून अनिधकृत बांधकाम सुरु आहे. यावरुन सध्या कोलाहल सुरु आहे. प्रशासनाने जर हे अनधिकृत बांधकाम हटवले नाही तर आम्हीच आंदोलन करुन हे बांधकाम हटवू.'' अशी रोखठोक भूमिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने घेतली आहे. अनधिकृत बांधकामाच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज, मंगळवारी (ता. १९) जॉगर्स पार्कमध्ये आंदोलन केले.
कार्यकर्ते म्हणाले, जॉगर्स पार्कमध्ये अतिशय सुंदर निसर्ग आहे. असंख्य नागरीक सकाळी तेथे व्यायामासाठी, निसर्ग अनुभवण्यासाठी येतात. पक्ष्यांची किलबिल कानी पडते. अशा सुंदर उद्यानात अनधिकृतरित्या मोठे बांधकाम केले जात आहे याचा बांधकामासाठी पुढाकार घेणाऱ्यांनी व बांधकामाला प्रोत्साहन देणाऱ्यांनी विचार करायला हवा होता. उद्यानातील हे मोठे बांधकाम म्हणजे चांगला परिसर भकास करण्याचे काम आहे. असे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करायला हवा आणि या अनधिकृत बांधकामाला प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित केले पाहिजे.
माजी महापौर मंगला कदम यांनी आमदार महेश लांडगे यांच्याशी झालेले बोलणे म्हणजे, एकमेकांची उणीदुणी काढण्याचा प्रकार आहे. यांची मिलिभगत आहे. तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो....असा हा प्रकार आहे. यामध्ये जनतेला संभ्रमात ठेवले जात आहे. त्यामुळे आम्ही इथे भाजप व राष्ट्रवादी कॉंगेस या दोन्ही पक्षांचा निषेध करत आहोत. प्रशासनाने हे अनधिकृत बांधकाम हटवले नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करुन आम्हीच बांधकाम हटवू.
शिवसेना उपशहर प्रमुख अनिल सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. रावसाहेब थोरत (शहर संघटक), प्रदिप संकपाळ (विभाग प्रमुख), ऋषिकेश जाधव (समन्वयक भोसरी), शाखाप्रमुख गोविंद तांबवडे, किसान शेवते, अनंत हिंगे, बापू ढेकले, मोहन गायकवाड, सुनील चौगुले , संदीप मते, दिनकर जाधव व पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. पक्षाच्या शहराध्यक्षपदी चेतन पवार यांची नियुक्ती झाल्यापासून शहरात शिवसेनेच्या कामास बळ मिळाले आहे.