राज्यभर ९९ ठिकाणी होणार एकदिवसीय साहित्य संमेलन व फिरते पुस्तक प्रदर्शन ........... आगामी १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद आणि पुणे पुस्तक महोत्सवातर्फे आयोजन
राज्यभर ९९ ठिकाणी होणार एकदिवसीय साहित्य संमेलन व फिरते पुस्तक प्रदर्शन
आगामी १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद आणि पुणे पुस्तक महोत्सवातर्फे आयोजन
पुणे, ता. १८ - आगामी १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद आणि पुणे पुस्तक महोत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर ९९ ठिकाणी एकदिवसीय साहित्य संमेलन व फिरते पुस्तक प्रदर्शन आयोजित केले जाणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी दिली आहे. जनमनांमध्ये साहित्याची आवड निर्माण करण्यासाठी कार्यक्रमाच्या संयोजनात मसापच्या विविध शाखांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन परिषदेतर्फे करण्यात आले आहे.
योगेश सोमण यांनी सांगितले की, महाराष्ट्र साहित्य परिषदेने १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला सुरुवात केली आहे. त्यातील पुस्तक प्रदर्शन व एकदिवसीय साहित्य संमलेन हा पहिला उपक्रम आहे. राज्यभर ९९ ठिकाणी साहित्य जागर करण्यासाठी हा उपक्रम होणार आहे. फिरत्या पुस्तक प्रदर्शनाची बस पुणे पुस्तक महोत्सवातर्फे उपलब्ध करून दिली जाणार आहे. मसापच्या विविध शाखांच्या ठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत. एकदिवसीय किंवा दोनदिवसीय संमेलनात परिसंवाद, साहित्यिकांच्या मुलाखती, अभिवाचन, वाचक मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण आदी कार्यक्रम होतील.
पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले की, डिसेंबरमध्ये पुणे पुस्तक महोत्सव होणार आहे. त्यापूर्वी फिरत्या पुस्तक प्रदर्शनाची बस राज्यभर विविध ठिकाणी फिरणार आहे. त्यातून १०० व्या साहित्य संमेलनाचा आणि पुस्तक महोत्सवाचा प्रचार केला जाईल. तसेच लवकरच याबाबत सामंजस्य करार करून अधिकृत कार्यक्रम जाहीर केला जाईल.