मोशी दुर्घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांचे निलंबन करावे, नगरसेविका ऐश्वर्या तरस यांची आयुक्तांकडे मागणी
मोशी दुर्घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांचे निलंबन करावे, नगरसेविका ऐश्वर्या तरस यांची आयुक्तांकडे मागणी
पिंपरी, ता. ११ जुलै २०२६ - मोशी कचरा डेपो येथे कचऱ्याचा ढिगारा घसरून झालेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी पर्यावरण विभागाचे मुख्य अधिकारी संजय कुलकर्णी आणि उपअभियंता योगेश आल्हाट यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे कचऱ्याचा मोठा ढिगारा घसरून महापालिकेची तीन मजली प्रशासकीय इमारत कोसळल्याने कर्मचारी आणि नागरिक अडकले. या दुर्घटनेमुळे कचरा व्यवस्थापनातील निष्काळजीपणा, सुरक्षेतील त्रुटी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करण्यात यावी. तसेच या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करावा आणि दोषींवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी. याशिवाय, भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी मोशी कचरा डेपोतील सुरक्षा व्यवस्था, कचरा साठवणुकीची पद्धत, ढिगाऱ्यांची स्थिरता आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजनांचे तातडीने पुनरावलोकन करून आवश्यक सुधारणा करण्याचीही मागणी नगरसेविका ऐश्वर्या तरस यांनी आयुक्तांकडे केली आहे.