पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित पवार यांचे तैलचित्र

पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित पवार यांचे तैलचित्र

पिंपरी-चिंचवड | १० ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयातील प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तैलचित्र लावण्यात आले आहे. भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या मागणीची दखल घेत महापालिका प्रशासनाने आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांना आणि अभ्यागतांना प्रवेशद्वाराजवळ अजित पवार यांचे तैलचित्र पाहायला मिळणार आहे.


आमदार महेश लांडगे यांनी ३१ जानेवारी २०२६ रोजी महापालिका प्रशासनाला पत्र पाठवून अजित पवार यांचे तैलचित्र मुख्यालयात लावण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार महापालिकेच्या स्थापत्य विभागाने कार्यवाही केली. मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील दर्शनी भागात तैलचित्र लावण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाने पत्राद्वारे दिली आहे.

महापालिकेच्या स्थापत्य विभागाचे मुख्य अभियंता-१ प्रमोद ओंभासे यांच्या स्वाक्षरीने आमदार लांडगे यांना यासंदर्भात पत्र पाठविण्यात आले आहे.

अजित पवार यांच्या विकासकार्याच्या स्मृती जपण्याचा उद्देश

पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते रुंदीकरण, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि विविध विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी अजित पवार यांनी पाठपुरावा केला होता. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून त्यांनी शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेतला होता.

शहराच्या विकासातील त्यांच्या योगदानाची आठवण जपण्याच्या उद्देशाने मुख्यालयात तैलचित्र लावण्याची मागणी करण्यात आली होती.

‘अजितदादांच्या कार्यातून लोकहिताची प्रेरणा मिळत राहील’

याबाबत आमदार महेश लांडगे म्हणाले की, अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्हा आणि महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. विकासकामांना गती देण्याची त्यांची कार्यपद्धती, प्रशासनावरील पकड आणि कामाच्या दर्जाबाबतचा आग्रह कायम स्मरणात राहील.

अजित पवार यांच्या स्मृती महापालिका मुख्यालयात जपल्या जाव्यात, या भावनेतून तैलचित्राची मागणी केली होती. प्रशासनाने ही मागणी पूर्ण केल्याबद्दल समाधान असल्याचे लांडगे यांनी सांगितले. त्यांच्या कार्यातून लोकहितासाठी काम करण्याची प्रेरणा मिळत राहील, असेही त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories