नवी सांगवी | १० ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवडमधील नवी सांगवी परिसरात नातवाने आजीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी नातवाने स्वतः सांगवी पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली. गंभीर जखमी अवस्थेतील आजीला रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.
मृत महिलेचे नाव मंगल बाबुराव शिंगोरे (वय ६०, रा. नवी सांगवी, पुणे) असे आहे. तर ओंकार किसन शिंगोरे (वय ३०, रा. पिंपळे गुरव, पुणे) असे आरोपी नातवाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (९ ऑक्टोबर) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नवी सांगवीतील धर्मवीर बँकेशेजारी असलेल्या शिंगोरे बिल्डिंगमध्ये ही घटना घडली.
त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ओंकार शिंगोरे सांगवी पोलीस ठाण्यात आला. त्याने पोलिसांना आपली आजी मंगल शिंगोरे हिच्या गळ्यावर चाकू खुपसून तिचा खून केल्याचे सांगितले.
ही माहिती मिळताच सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मंगल शिंगोरे घरातील बाथरूममध्ये गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्या.
त्यांना तातडीने उपचारासाठी औंध जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त संदीप आटोळे आणि मनीषा कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, पोलीस निरीक्षक अमोल नांदेडकर, सहायक पोलीस निरीक्षक नारायण पाटील तसेच इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात पुढील तपास आणि कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.