पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक; वाहन परवानगीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना
पुणे | १० ऑक्टोबर २०२६ : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या प्रचारासाठी उमेदवार आणि त्यांच्या निवडणूक प्रतिनिधींना वाहन परवानगी देण्याचे अधिकार आता संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे उमेदवारांना प्रचारासाठी आवश्यक वाहन परवानगी सुलभ आणि तातडीने मिळण्यास मदत होणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून, संबंधित क्षेत्रात आचारसंहिता लागू आहे. या निवडणुकीतील उमेदवारांची अंतिम यादी शुक्रवारी, ९ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे निवडणूक प्रतिनिधी प्रचारासाठी पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये वाहन वापरण्याची परवानगी मागत आहेत. ही परवानगी मिळविण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर अधिकार प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एक खिडकी व्यवस्थेतून मिळणार वाहन परवानगी
नवीन आदेशानुसार, प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनाची नोंदणी ज्या जिल्ह्यात आहे, त्या जिल्ह्यातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या एक खिडकी व्यवस्थेतून वाहन परवानगी दिली जाणार आहे.
विशेष म्हणजे, या व्यवस्थेतून पुणे विभागातील सर्व पाच जिल्ह्यांसाठी वाहन परवानगी मिळू शकणार आहे. परवानगी देताना मोटार वाहन अधिनियमातील संबंधित तरतुदींचे पालन करणे आवश्यक असणार आहे.
या निर्णयामुळे निवडणूक प्रचारासाठी वाहन परवानगी मिळविताना उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करणे अधिक सुलभ होणार आहे. तसेच, परवानगी देण्याची प्रक्रिया जलद गतीने राबविण्यास मदत होणार आहे.