अजितदादांच्या स्मरणार्थ पाषाणमध्ये अतिविशेषोपचार रुग्णालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करावा - हसन मुश्रीफ
अजितदादांच्या स्मरणार्थ पाषाणमध्ये अतिविशेषोपचार रुग्णालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करावा - हसन मुश्रीफ
पिंपरी, ता. ३१ जुलै २०२६ - दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ पाषाण येथे अतिविशेषोपचार रुग्णालय सुरू करण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तातडीने तयार करून तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या रुग्णालयासंदर्भातील पुण्यात २९ जुलैला झालेल्या बैठकीत दिले.
पाषाण येथील उपलब्ध जागा भविष्यातील विस्तारासाठी तसेच पुढील २० वर्षांचा विचार करून नियोजन करण्याच्या दृष्टीने अधिक जागेची आवश्यकता असल्याने येरवडा तसेच इतर उपलब्ध जागांची संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर अहवाल सादर करावा. त्यानंतर नव्या जागेच्या उपलब्धतेनुसार अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या उभारणीसाठी आवश्यक कार्यवाही करावी. सर्वसामान्यांना स्थानिक पातळीवरच अत्याधुनिक उपचार मिळावेत, हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, वैद्यकीय शिक्षण आयुक्त डॉ. अनिल भंडारी, ससून रूग्णालयाचे अधिष्ठाता एकनाथ पवार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.