'महापालिकेला ताला ठोको आंदोलन' करण्याचा आमदार रोहित पवारांचा इशारा
मोशी दुर्घटना चौकशी व शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेबाबत आमदार रोहित पवारांनी घेतली अतिरिक्त आयुक्तांची भेट
पिंपरी, ता. ३१ जुलै २०२६ - मोशी येथील कचरा डेपो परिसरातील दुर्घटनेची सर्वंकष चौकशी करावी. या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या घनकचरा, पर्यावरण आणि इतर संबंधित विभागातील सर्व अधिकाऱ्यांना केवळ निलंबित न करता बडतर्फ करावे आणि त्यांच्यासह संबंधित कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बागडे यांच्याकडे केली आहे. अन्यकाही मागण्याही पवार यांनी मांडल्या आहेत. पुढील १० दिवसांत कार्यवाही झाली नाही महापालिकेला 'ताला ठोको आंदोलन' करण्याचा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.
आमदार पवार यांनी अतिरिक्त आयुक्त विक्रम बगाडे यांची गुरुवारी (ता. ३०) भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. मोशी दुर्घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करावे आणि संबंधित कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा ही मुख्य मागणी त्यांनी मांडली. तसेच, कचरा डेपोतील रसायनमिश्रित घाण पाण्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा त्रास होत असून याबाबतही आवश्यक ती कारवाई आणि तातडीच्या उपाययोजना करण्याचीही मागणी केली.
याशिवाय स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेतील ६० ते ७० टक्के कॅमेरे बंद असून हा जनतेच्या पैशांचा अपव्यय तर आहेच, पण नागरिकांच्या सुरक्षेलाही हा गंभीर धोका आहे. त्यामुळे या संपूर्ण यंत्रणेचेही स्वतंत्र ऑडिट करून बंद असलेले सीसीटीव्ही पूर्ववत सुरू करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचीही मागणी केली.
रोहित पवार म्हणाले की, ''यासंदर्भात महापालिका योग्य निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे, त्यासाठी पुढील १० दिवस आम्ही वाट बघू अन्यथा सामान्य पिंपरी-चिंचवडकरांच्यावतीने नाईलाजाने महापालिकेला ताला ठोको आंदोलन करावं लागेल.''