आकुर्डीत तडीपार आरोपीकडून कोयता जप्त, निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पिंपरी, ता. १६ - शस्त्रबंदी आदेशाचा भंग करुन सार्वजनिक ठिकाणी कोयता बाळगणाऱ्या तसेच तडीपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आरोपीस निगडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवारी (ता. १४) आकुर्डी येथील क्रांतीनगर परिसरात करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोपाळ अंकुश हळनोर (वय २५, रा. जय गणेश हौसिंग सोसायटी, घरकुल, चिखली) याच्याविरोधात निगडी पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. १५) भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१)(३), १३५ व १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी (ता. १४) रात्री सुमारे १०.२२ वाजण्याच्या सुमारास आकुर्डी येथील विठ्ठल मंदिराच्या पाठीमागे, क्रांतीनगर परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर आरोपी संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार निगडी पोलिसांनी कारवाई करत आरोपीकडून सुमारे २०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता जप्त केला.
तपासादरम्यान आरोपीवर यापूर्वी तडीपारची कारवाई करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ १, पिंपरी-चिंचवड यांनी आदेश क्रमांक ०५/२०२६ अन्वये आरोपीस पिंपरी-चिंचवड, पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतून एक वर्षासाठी तडीपार केले होते. दिनांत १५ जानेवारी २०२६ रोजी त्यास हद्दपार करण्यात आले होते. मात्र कोणतीही परवानगी न घेता तो पुन्हा हद्दीत आढळून आल्याने त्याच्यावर आणखी गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस शिपाई प्रदीप चंद्रसिंग पावरा यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.