'काळा दिवस' आंदोलनातून केंद्र सरकारच्या कामगारविरोधी कायद्यांचा निषेध
पिंपरी, ता. २ - 'काळा दिवस' आंदोलन करुन केंद्र सरकारच्या नव्या चार कामगार कायद्यांचा उद्योगनगरीतील कामगारांनी निषेध केला. बुधवारी (ता. १) इंटक व व हिंद कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौकात हे आंदोलन झाले.
या आंदोलनात कामगार संघटना सहभागी झाल्या. आंदोलनात सहभागी कामगारांनी काळ्या फिती लावून व काळे झेंडे उंचावून घोषणाबाजी केली. केंद्र शासनाने चार नवीन कामगार कायदे कामगार संघटनांशी कोणतीही पूर्वचर्चा न करता लागू केले आहेत, असा आरोप करत कामगारविरोधी कायदे मागे घेण्याची मागणी आंदोलकांनी केली.
इंटकचे प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास कदम म्हणाले, '' केंद्र सरकारने नवी चार कामगार कायदे कामगार संघटनांना विश्वासात न घेता केले आहेत. हे कायदे कामगारविरोधी असून ते रद्द केले पाहिजेत.''
आंदोलनात विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी मनोहर गडेकर, शीतल कोतवाल, चेतन आगरवाल, मयूर दाभाडे, गिरीश मॅगे, राजेंद्र खराडे, नुरुद्दीन इनामदार, विजय जाधव, गायत्री सोनार, शशिकांत धुमाळ, सुनील देसाई, यशवंत सुपेकर, शांताराम कदम, तुषार पाटील सहभागी झाले.