अन्वी हिंगेची रशियात सुवर्णभरारी; आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत दोन पदके

अन्वी हिंगेची रशियात सुवर्णभरारी; आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत दोन पदके

पिंपरी-चिंचवड | १२ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवडच्या युवा बुद्धिबळपटू अन्वी दिपक हिंगे हिने रशियात भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला आहे. रशियातील तुला येथे १ ते ११ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या २० व्या आशियाई शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत अन्वीने मुलींच्या नऊ वर्षांखालील गटात ब्लिट्झ प्रकारात सुवर्णपदक, तर स्टँडर्ड प्रकारात रौप्यपदक पटकावले. या दुहेरी यशामुळे तिच्या आंतरराष्ट्रीय पदकांची संख्या आता १५ वर पोहोचली आहे.

चिंचवड येथील एलप्रो इंटरनॅशनल स्कूलमध्ये चौथीत शिकणाऱ्या अन्वीने ब्लिट्झ प्रकारात नऊ फेऱ्यांमध्ये आठ विजय मिळवत आठ गुणांची कमाई केली. तिने तुर्कमेनिस्तानच्या बागुल जुमायेवा हिला अर्ध्या गुणाने मागे टाकत सुवर्णपदक जिंकले. विशेष म्हणजे, पाचव्या फेरीतील पराभवानंतर अन्वीने सलग चार सामने जिंकून विजेतेपद निश्चित केले. या प्रकारात तिने १,८३२ चे कामगिरी मानांकन नोंदवले.

स्टँडर्ड प्रकारातही अन्वीने दमदार खेळ करत नऊ फेऱ्यांत साडेसहा गुण मिळवले आणि रौप्यपदक पटकावले. या गटात कझाकस्तानच्या अमालिया येद्रेसहेवाने आठ गुणांसह सुवर्णपदक मिळवले. स्पर्धेत १२ देशांतील एकूण ३१८ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

अन्वीला ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे, आंतरराष्ट्रीय मास्टर निखिल दीक्षित आणि मानसिक प्रशिक्षण मार्गदर्शक ऋतू बळ्यान चौधरी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. वयाच्या आठ वर्षे अकरा महिन्यांत तिने वुमन कॅन्डिडेट मास्टर हा किताब मिळवला होता. यापूर्वीही जागतिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धांमध्ये तिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

अन्वीचे प्रशिक्षक निखिल दीक्षित यांनी तिच्या एकाग्रतेचे, वेगवान निर्णयक्षमतेचे आणि पराभवानंतर पुनरागमन करण्याच्या वृत्तीचे कौतुक केले. अन्वीचे वडील दिपक हिंगे यांनी तिच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत मोरडे स्पोर्ट्स फाउंडेशन, लक्ष्य स्पोर्ट्स, प्रशिक्षक आणि शाळेचे आभार मानले.

‘भारतासाठी सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकल्याचा खूप आनंद आहे. भविष्यात जागतिक स्तरावर आणखी मोठी विजेतेपदे जिंकायची आहेत,’ अशी प्रतिक्रिया अन्वीने दिली.

या कामगिरीमुळे पिंपरी-चिंचवडच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories