मोशीत अनोळखी महिलेचा खून

मोशीत अनोळखी महिलेचा खून

पिंपरी-चिंचवड | १२ ऑक्टोबर २०२६ : मोशी परिसरातील मंत्रा मोमेंट हाउसिंगच्या कमर्शियल कार्यालयासमोर एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. महिलेवर हत्याराने वार करून तिचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. १२ ऑक्टोबर) पहाटे २ वाजून १२ मिनिटांच्या सुमारास डायल ११२ या आपत्कालीन क्रमांकावरून पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. मोशी येथील मंत्रा मोमेंट हाउसिंगच्या कमर्शियल कार्यालयातील गाळा क्रमांक ७ समोर एका महिलेचा मृतदेह पडल्याचे कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

मृत महिलेचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे आहे. तिने भगव्या रंगाचा टी-शर्ट, त्यावर निळसर रंगाचे जिन्सचे जॅकेट आणि काळसर व हिरव्या पट्ट्यांची ट्रॅकपँट परिधान केली होती. महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.

अज्ञात व्यक्तीने कोणत्यातरी कारणावरून महिलेवर हत्याराने वार करून गंभीर दुखापत केली आणि तिचा खून केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, हत्येमागील नेमके कारण आणि आरोपीची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.

या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८२१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. भोजराज मिसाळ या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories