पेट्रोलपंपावर कामगारांची ग्राहक व त्याच्या मित्रांना मारहाण, निघोजे येथील घटना
पुणे, ता. १४ - पेट्रोलपंपावर ट्रेलरमध्ये डिझेल भरण्याच्या कारणावरुन वाद होऊन या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. हा प्रकार रविवारी (ता. १२) रात्री सुमारे ८.३० वाजता खेड तालुक्यातील निघोजे येथील महिंद्रा सर्कलजवळील जय श्रीनाथ एच. पी. पेट्रोलपंपावर घडला आहे. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबत भरत तुकाराम पालवे (वय ४३, वाहन चालक, मूळ रा. वंजारवाडी, ता. शिरुर, जि. बीड) यांनी तक्रार दिली आहे. या घटनेत वैद्यनाथ संतोष यादव (वय ३३ वर्षे), लवकुश शिवगणेश यादव (वय २२ वर्षे), ललित यादव व अजय यादव हे आरोपी आहेत. हे सर्व पेट्रोल पंपावरील कर्माचारी आहेत. पालवे आपल्या ट्रेलरमध्ये डिझेल भरण्यासाठी मित्रासह पेट्रोलपंपावर गेले असता त्यांचा आरोपींशी वाद झाला. या वादात पेट्रोलपंपावरील कामगार ललित यादव याने फिर्यादी पालवे यांना शिवीगाळ व दमदाटी केली. तेथील व्यवस्थापकादेखत वाद मिटला. त्यानंतर फिर्यादी व त्यांचे मित्र जवळील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले असता आरोपी ललित यादव व त्याचा भाऊ वैजनाथ यादव यांनी तेथे जाऊन पुन्हा पालवे व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करत व धमकी दिली. यानंतर फिर्यादी व त्यांचे मित्र पेट्रोलपंपावर जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपींनी पुन्हा वाद घालत मारहाण केली. वैजनाथ यादव याने लोखंडी रॉडने मारहाण केल्याने फिर्यादी पालवे यांना गंभीर दुखापत झाली, तर लवकुश यादव व अजय यादव यांनी काठ्यांनी मारहाण करुन इतर दोघांना जखमी केले.
या प्रकरणी आरोपींविरोधात दक्षिण महाळुंगे पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 118(2), 115(2), 351(1), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी क्र. 1 व 2 यांना पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.