किरकोळ शाब्दिक वादातून व्यावसायिकावर रिक्षाचालकाने लोखंडी हत्याराने वार, पुनावळे येथील घटना
किरकोळ शाब्दिक वादातून व्यावसायिकावर रिक्षाचालकाने लोखंडी हत्याराने वार, पुनावळे येथील घटना
पिंपरी, ता. १४ - पुनावळे येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसमोर रस्त्याच्या विरुद्ध दिशेने आलेल्या अज्ञात ऑटो रिक्षाचालकाने रियल इस्टेट कन्सलटंटवर लोखंडी हत्याराने हल्ला करुन त्याला गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. या प्रकरणी सोमवारी (ता. १३) रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी संतोष भोसले (वय २७ वर्षे, रा. जांभे) याला अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी प्रविण प्रकाश कुंभार (वय ३४, रा. बी-११०५, सारा मेट्रो व्हिले सोसायटी, पुनावळे) रविवारी (ता. १२) रात्री सुमारे १०.४५ वाजता आपल्या वाहनाने जात असताना, समोरुन रस्त्याच्या विरुद्ध दिशेने आलेल्या रिक्षाचालकाला त्यांनी हटकले. यावर रिक्षाचालकाने उध्दट वर्तन करत वाद घातला. त्यानंतर संबंधित रिक्षाचालकाने फिर्यादीला थांबवून खाली उतरवले व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता, त्याने आपल्या रिक्षामधून लोखंडी हत्यार बाहेर काढून फिर्यादीच्या डाव्या हाताच्या पंजावर हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादीच्या तळहाताला गंभीर जखम होऊन सात टाके पडले आहेत.असल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर सोमवारी (ता. १३) रावेत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ३५१ (२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी संतोष अशोक भोसले (वय २७, रा. चितळा देवी नगर, जांभे, ता. मुळशी) याला पोलिसांनी अटक केली आहे.