‘अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिरा’चे ७ आणि ८ मार्च पीडब्ल्यूडी मैदानावर आयोजन
पिंपरी, ता. ४ - लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या ६३ व्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड येथे ११ व्या ‘अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. ७ आणि ८ मार्च २०२६ रोजी नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर हे शिबिर होणार असून, महाराष्ट्रातील नामवंत रुग्णालये आणि तज्ज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत. अशी माहिती आमदार शंकर जगताप यांनी दिली.
आमदार शंकर जगताप यांनी याबाबत माहिती दिली. या शिबिराचे उद्घाटन सकाळी १० वाजता होईल. सायंकाळी ५ वाजेपर्यंत रुग्णांची तपासणी व उपचार केले जाणार आहेत. ‘लक्ष्मणभाऊंचा वारसा रुग्णसेवेचा, संकल्प जनतेच्या निरोगी आयुष्याचा’ हे ब्रीद समोर ठेवून शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे. या महाआरोग्य शिबिरात साध्या तपासणीपासून ते जटिल शस्त्रक्रियांपर्यंतच्या मार्गदर्शनाबाबत सुविधा उपलब्ध आहेत. हृदयरोगांसाठी एन्जोप्लास्टी, हृदयाच्या झडपांची शस्त्रक्रिया तसेच लहान मुलांच्या हृदयातील छिद्रावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. कॅन्सर तपासणी, केमोथेरपी व रेडिएशनबाबत मार्गदर्शन दिले जाईल. गुडघे व खुबा प्रत्यारोपण, मोतीबिंदू, प्लास्टिक सर्जरी आणि मणक्याचे आजार यांवरील शस्त्रक्रियाही केल्या जाणार आहेत. एमआरआय, सिटी स्कॅन, मॅमोग्राफी, सोनोग्राफी व डायलिसिस यांसारख्या तपासण्या उपलब्ध राहतील. तसेच फिजिओथेरपी, आयुर्वेदिक उपचार, पंचकर्म, होमिओपॅथी आणि मोफत औषध वाटपाची सुविधा देण्यात येणार आहे.
शहरातील नामांकित रुग्णालयांचा सहभाग
शहरातील ७० हून अधिक रुग्णालयांचा सहभाग या शिबिरात असणार आहे. यात वायसीएम, ससून सर्वोपचार रुग्णालय, आदित्य बिर्ला मेमोरियल रुग्णालय, जहांगीर रुग्णालय, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, रुबी हॉल क्लिनिक, सह्याद्री रुग्णालये आणि डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय यांसारख्या नामांकित संस्थांचा समावेश आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी ओळख व पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र तसेच जुने वैद्यकीय अहवाल सोबत आणावेत, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ७७७५९८११११ किंवा ९८५०१७११११ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.
लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांनी राजकारणापलीकडे जाऊन समाजकारणाला आणि त्यातही प्रामुख्याने रुग्णसेवेला महत्व दिले. ‘अटल महाआरोग्य शिबिर’ केवळ उपक्रम नसून, हा एक पवित्र सेवायज्ञ आहे. ज्या गोरगरीब रुग्णांना मोठ्या रुग्णालयातील खर्च पेलवत नाही, त्यांना एकाच छताखाली तज्ज्ञ डॉक्टर्स आणि मोफत शस्त्रक्रिया मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, हीच भाऊंना खरी श्रद्धांजली आहे. यावर्षी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक अचूक तपासण्यांवर भर दिला आहे.” यात नामांकित रुग्णालय, डॉक्टर सहभागी होणार आहे.
– शंकर जगताप
आमदार, पिंपरी चिंचवड शहर