news
clock

‘अटल महाआरोग्य शिबिर’ केवळ एक उपक्रम नसून, ते खऱ्या अर्थाने जनसेवेचे मिशन - डॉ. ओमप्रकाश शेटे 

पिंपरी, ता. ७ - ''राज्यातील सामान्य आणि गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मोफत मिळवून देण्यासाठी ‘आयुष्मान भारत मिशन’ आणि ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी’ हे मोठे आधारवड ठरत आहेत. पिंपरी-चिंचवडमधील हे ‘अटल महाआरोग्य शिबिर’ केवळ एक उपक्रम नसून, ते खऱ्या अर्थाने जनसेवेचे मिशन आहे. या सेवेचा वसा घेऊन आमदार शंकर जगताप आणि त्यांचे सहकारी स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांचा आरोग्य सेवेचा वारसा अत्यंत प्रामाणिकपणे पुढे नेत आहेत.'', असे गौरवोद्गार आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी शनिवारी काढले.

सांगवी पीडब्ल्यूडी मैदान येथे लोकनेते स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या ६३ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘अटल महाआरोग्य शिबिरा’च्या उद्घाटन प्रसंगी डॉ. शेटे बोलत होते. शिबिराचे आयोजन आमदार शंकर जगताप मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. यावेळी महापौर रवी लांडगे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, शहर सुधारणा समितीचे सभापती संजय काटे, कला, क्रीडा, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे, शिक्षण समितीच्या सभापती रवीना अंगोळकर, आरोग्य विभाग पुणे परिमंडळाचे उपसंचालक भगवान पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, पिंपरी चिंचवड महापालिका वायसीएम हॉस्पिटल वैद्यकीयअधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. लक्ष्मण गॊफणे, डॉ. मनोज कुमार शर्मा, एमक्युअर फार्मासिटिकलचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष राजेश नायर तसेच विविध आरोग्य संस्थांचे प्रतिनिधी, ७० हून अधिक हॉस्पिटलचे मान्यवर डॉक्टर, परिचारिका, रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते. 

डॉ. ओमप्रकाश शेटे त्यांनी आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशाला दिशा देत असल्याचे नमूद केले. डॉ. शेटे म्हणाले की, ''पूर्वी फक्त २५ हजार रुपयांपर्यंत मिळणारी मदत आता २ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. शासन आणि धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे १८०० कोटी रुपयांची मदत गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा १.५ लाखांवरून ५ लाख रुपये करण्यात आली आहे. राज्यातील  संलग्न रुग्णालयांची संख्या १७९२ वरून ४५३७ पर्यंत वाढवण्यात आली आहे, त्याद्वारे दुर्गम भागातील रुग्णांनाही उपचार मिळतील.''

महिलांच्या आरोग्याबाबत बोलताना डॉ. शेटे यांनी सर्वाइकल कॅन्सर (गर्भाशयाचा कॅन्सर) रोखण्यासाठी लसीकरणाचे महत्त्व सांगितले. ''लसीकरणाबाबत समाजात पसरवले जाणारे गैरसमज चुकीचे आहेत.  ‘अटल महाआरोग्य शिबिरा’च्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांपर्यंत या आरोग्य सुविधा पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.'', असे त्यांनी स्पष्ट केले. समाजातील उपेक्षित असलेल्या तृतीयपंथी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयुष्यमान मिशनच्या माध्यमातून योजना आणल्या जातील. रामायणातील त्यांच्या निष्ठेचा दाखला देत त्यांनी सांगितले की, तृतीयपंथी समाजाला ‘आयुष्मान भारत’ योजनेचा १००% लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनामार्फत विशेष मिशन राबवले जाईल.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना शिवले यांनी केले.  डॉ. देविदास शेलार यांनी प्रास्ताविक केले.

पुणे-पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र ‘कंट्रोल रूम’

आयुष्मान भारत कार्ड आणि सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बाबी लवकरच सुरळीत होतील. विशेषतः पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील तक्रारी सोडवण्यासाठी स्वतंत्र ‘कंट्रोल रूम’ (नियंत्रण कक्ष) किंवा कॉन्फरन्स रूम उभारण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

अंत्योदय’ संकल्पनेतून शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न...

“स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी ११ वर्षांपूर्वी या सेवायज्ञाचे रोपटे लावले होते, आज त्याचे रूपांतर एका विशाल वटवृक्षात झाले आहे. हे अकरावे ‘अटल महाआरोग्य शिबिर’ केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसून, भारतीय जनता पार्टीच्या ‘अंत्योदय’ संकल्पनेतून शेवटच्या घटकापर्यंत विकास आणि सेवा पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. यंदाच्या शिबिरात ८५ नामांकित रुग्णालये सहभागी असून ११० हून अधिक आजारांवर केवळ मोफत तपासणीच नाही, तर पुढील उपचारांचीही संपूर्ण जबाबदारी आमची  आहे. - आमदार शंकर जगताप

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories