भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणणे ही काळाची गरज : महापौर रवी लांडगे ..............महानगरपालिकेच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणणे ही काळाची गरज : महापौर रवी लांडगे
महानगरपालिकेच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
पिंपरी, ता. १४ - ''भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समता, स्वातंत्र्य आणि न्यायाचा विचार हा आपल्या संविधानाचा पाया आहे. त्यांनी दिलेल्या शिक्षण, संघटन आणि संघर्षाच्या मंत्रामुळे समाजात परिवर्तन घडले. आपण सर्वांनी बाबासाहेबांच्या विचारांना केवळ स्मरणात न ठेवता आचरणात आणणे ही काळाची गरज आहे., ''असे प्रतिपादन महापौर रवी लांडगे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस, भीमसृष्टी तसेच एच. ए. कॉलनी आणि दापोडी येथील पुतळ्यास महापौर लांडगे तसेच महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. विविध ठिकाणच्या या अभिवादन प्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, माजी महापौर योगेश बहल,नगरसदस्य बाबासाहेब त्रिभुवन, कुशाग्र कदम, डॉ. सुहास कांबळे, मंदार देशपांडे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, माई काटे, वर्षा जगताप, यांच्यासह अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, सहशहर अभियंता अजय सुर्यवंशी, उपआयुक्त अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
''पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांच्या कार्याचा जागर करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ११ ते १७ एप्रिल या कालावधीत ‘सामाजिक समता सप्ताह’आणि ‘विचार प्रबोधन पर्व’ आयोजित करण्यात आले आहे. या पर्वाच्या माध्यमातून महापुरुषांच्या विचारांचा प्रसार करुन समाजात जागर निर्माण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. या उपक्रमांमध्ये शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन समता, बंधुता आणि सामाजिक जबाबदारी यांचा संदेश अधिक व्यापक करण्यासाठी पुढाकार घ्यावा.'', असे आवाहन देखील महापौर लांडगे यांनी केले.
हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी -
पिंपरी येथील भीमसृष्टी परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर एकता कर्मचारी संघटनेच्या वतीने हेलिकॉप्टरच्या माध्यमातून भव्य पुष्पवृष्टी करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी मानवंदना देण्यात आली. आकाशातून होत असलेल्या या पुष्पवृष्टीमुळे परिसरात उत्साहपूर्ण आणि भारावलेले वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित नागरिकांनी या अनोख्या उपक्रमाचा मोठ्या उत्साहात साक्षीदार होत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला अभिवादन केले.