रिक्षा खरेदी-विक्री व्यवहारात ग्राहकाची १ लाखाची फसवणूक
पिंपरी, ता. ९ - वाकड परिसरात एका रिक्षा विक्री प्रकरणात मोठी फसवणूक झाली आहे. रिक्षा खरेदी करणाऱ्या ग्राहकाकडून पैसे घेऊन रिक्षा विकताना चुकीचा व्यवहार करुन ग्राहकाची १ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. आरोपीविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकास अभिमन्यु वाघमारे (वय ४३, ड्रायव्हर) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किशोर उर्फ सचिन सुधाकर बागडे (मूळ रा. शिवले वस्ती, भिमा कोरेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) याने नवीन अल्टो रिक्षा विकण्याच्या नावाखाली ५,०००/- रुपये बुकींग अमाउंट आणि १,०५,०००/- रुपये रोख घेतले. मात्र, रिदम ऑटो विनोदे वस्ती, वाकड येथील शोरुमची बनावट पावती दाखवून वाघमारे यांना विना परमिट, विना नंबर विना इन्शुरन्स रिक्षा देऊ केली. त्यावर वाघमारे यांनी आक्षेप घेतला असता आरोपीने रिक्षा शोरुमला जमा करुन घेऊन पैसे परत न करता विश्वासघात करुन १ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक केली.
आरोपीविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम ३१६ (२) आणि ३१८ (४) नुसार गुन्हा दाखल केला असून, आरोपी अद्याप अटक केलेला नाही. पोलीस चौकशी सुरु आहेत.