चिखलीमधील भीमशक्तीनगर झोपडपट्टीतील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड द्यावे, भीमशक्तीनगर सामाजिक विकास संस्थेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
चिखलीमधील भीमशक्तीनगर झोपडपट्टीतील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड द्यावे, भीमशक्तीनगर सामाजिक विकास संस्थेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
पिंपरी, ता. ५ - चिखली येथील भीमशक्तीनगर झोपडपट्टी गेली २५ ते ३० वर्षे अस्तित्वात असल्याने येथील बांधकामे नियमित करावीत व रहिवाशांना मालकी हक्क प्रॉपर्टी कार्ड द्यावे, अशी मागणी भीमशक्तीनगर सामाजिक विकास संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
याबाबत, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब वाघमारे व उपाध्यक्ष रामकिशन भडंगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भीमशक्ती नगर झोपडपट्टी ही गेली २५ ते ३० वर्षांपासून अस्तित्वात आहे. येथील घरांची संख्या अंदाजे २५०० ते ३००० आहे. तसेच येथील मतरदार ४५०० ते ५००० असूनही राजकीय नेत्यांनी व पुढाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही.
भीमशक्तीनगरमध्ये सेवा शुल्क आकारावे यासाठी संस्था सन २००४ च्या आगोदर पासून शासनाकडे पाठपुरावा करत आहे. मात्र, शासकीय अधिकाऱ्यांनी हा निर्णय धोरणात्मक असून त्याबाबत शासनाकडून निर्णय आल्यास संस्थेला कळवण्यात येईल, असे लेखी सांगितले. आज, भीमशक्ती नगर झोपडपट्टीतील एका कुटुंबाकडेही कराच्या पावत्या नाहीत, मतदानकार्ड आहेत तर त्यावर स्थानिक जागेचा पत्ता नाही.
सध्या येथील झोपडीधारकांकडे लाईट बिल, सन २००४ ला महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणाच्या पावत्या आहेत, त्याही मोजक्याच रहीवाशांकडे आहेत. त्यामुळे भीमशक्तीनगरमध्ये कर आकारण्यासाठी सर्वेक्षण करण्यात यावे व येथील नागरीकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी नियम-अटी शिथील करुन न्याय देण्यात यावा.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शासकिय जमिनींवरील रहीवासी अतिक्रमणे नियमित करुन, रहीवासियांना भोगवाटा वर्ग (२) मालकी हक्क, प्रोपर्टी कार्ड मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे संपर्क करण्यास सांगितले आहे. त्यानुसार संस्था निवेदन देत आहे, असे संस्थेने निवेदनात स्पष्ट केले आहे.