भोसरीत पीएमपीएमएल बस-दुचाकीच्या धडकेनंतर वाद; परस्परविरोधी गुन्हे दाखल

भोसरीत पीएमपीएमएल बस-दुचाकीच्या धडकेनंतर वाद; परस्परविरोधी गुन्हे दाखल

भोसरी | ११ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परिसरात पीएमपीएमएल बस आणि दुचाकीच्या धडकेनंतर वाद होऊन मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. हुतात्मा चौक, आळंदी रोड येथे ९ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे १ वाजून ५० मिनिटांनी ही घटना घडली. या प्रकरणात बसचालक आणि दुचाकीवरील महिला यांनी एकमेकांविरोधात स्वतंत्र फिर्यादी दिल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल संजुकांत पवार (वय २८ वर्षे, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे) हे पीएमपीएमएल बस क्रमांक एमएच १२ वायबी १६९४ घेऊन हडपसरच्या दिशेने जात होते. भोसरीतील हुतात्मा चौकात आल्यानंतर त्यांच्या बसची हिरो कंपनीच्या ड्युएट दुचाकी क्रमांक एमएच १४ जीएच ३०१० हिला धडक लागली.

या घटनेनंतर दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेने (वय ४५ वर्षे, राहणार आळंदी रोड, भोसरी, पुणे) यांनी बसचालकाला शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

तसेच दुचाकी चालवणाऱ्या अनोळखी व्यक्तीने बसचालकाला शिवीगाळ करत दगडाने बसची काच फोडली. त्यानंतर त्याच दगडाने बसचालकाच्या उजव्या डोळ्याच्या भुवईवर मारून त्याला जखमी केले, असे बसचालकाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.

दरम्यान, याच घटनेप्रकरणी एका ४५ वर्षीय महिलेने स्वतंत्र फिर्याद दिली आहे. महिलेच्या तक्रारीनुसार, त्या हिरो ड्युएट दुचाकीवरून आळंदी रोडने भोसरीच्या दिशेने जात असताना हुतात्मा चौकाजवळ पीएमपीएमएल बसचालकाने वाहन हयगयीने व बेदरकारपणे चालवून त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

या धडकेमुळे दुचाकीच्या डाव्या बाजूच्या इंडिकेटरवरील काचेचे नुकसान झाले. तसेच स्वतःच्या आणि इतरांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. बसचालकाला थांबवण्यासाठी दरवाजाच्या काचेतून हात घातला असता बसचालकाने त्यांच्या हातावर लाथ व चापट मारल्याची तक्रारही महिलेने केली आहे.

या घटनेबाबत भोसरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून, दोन्ही बाजूंनी केलेल्या तक्रारींच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories