भोसरी | १२ ऑक्टोबर २०२६ : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलाने स्वतःच्या ६३ वर्षीय आईला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना भोसरीतील चक्रपाणी वसाहतीत घडली आहे. आरोपीने आईवर चाकूने हल्ला करून तिला जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एका ६३ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपी राहुल प्रल्हाद तळोले (वय ४५, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी, पुणे) हा फिर्यादी महिलेचा मुलगा आहे.
ही घटना ८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास भोसरीतील श्रीरामनगर परिसरातील राहत्या घरी घडली.
फिर्यादीनुसार, राहुल तळोले हा त्याच्या वडिलांकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत होता. पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत आरोपीने वडिलांच्या छातीवर लाथ मारल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
त्यानंतर आरोपीने स्वयंपाकघरातील चाकू घेऊन वडिलांना जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादी आई भांडण सोडवण्यासाठी गेली असता या झटापटीत चाकूचा वार तिच्या डाव्या हाताच्या मनगटावर आणि मनगटाच्या खाली लागल्याने ती जखमी झाली.
आरोपीने आईच्या पोटात लाथ मारून तिला खाली पाडले. त्यानंतर वडिलांच्या डाव्या डोळ्यावर बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७५२/२०२६ दाखल करण्यात आला.
भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ११५(२), ३५२ आणि ३५१(३) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपी राहुल तळोले याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.