हिंजवडी | १२ ऑक्टोबर २०२६ : मुळशी तालुक्यातील मारुंजी परिसरात हॉटेलचे बिल भरण्याच्या कारणावरून एका २७ वर्षीय तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. आरोपींनी शिवीगाळ करत पेटीएम स्कॅनरचे मशीन तरुणाच्या डोक्यात मारून त्याला जखमी केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याचा मोबाईल फोन फोडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वेश मनोज संत (वय २७, सध्या रा. अथर्व पार्क, चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे; मूळ - भुसावळ, जि. जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
ही घटना १० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास मारुंजी येथील लक्ष्मी चौकाजवळ असलेल्या हॉटेल जय मल्हारमध्ये घडली.
फिर्यादीनुसार, हॉटेलमध्ये बिल भरण्याच्या कारणावरून वाद झाला. त्यावेळी आरोपींनी सर्वेश संत यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच पीटीएम स्कॅनरचे मशीन त्यांच्या डोक्यात मारल्याने ते जखमी झाले.
या प्रकरणी शिवदास घनवट (पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही) आणि हॉटेल जय मल्हारमध्ये काम करणारे तीन अनोळखी कर्मचारी अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, हॉटेलमधील तीन अनोळखी व्यक्तींनी सर्वेश यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीदरम्यान त्यांच्यापैकी एकाने सर्वेश यांचा मोबाईल फोन फोडून नुकसान केले.
या घटनेनंतर सर्वेश संत यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८७५/२०२६ नोंदविण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३२४(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.