ओव्हरहेड केबल्स काढण्यासाठी पुणे महापालिकेने मागवले ड्रोन कटर
पुणे, ता. ८ - शहरभर पसरलेल्या ओव्हरहेड केबल्स काढण्याची मोहिम पुणे महापालिका राबवत आहे. महापालिकेकडे सुमारे ३३ फूटांपेक्षा जास्त उंचीवरील केबल्स काढण्यासाठी साधने उपलब्ध नसल्याने कारवाईला मर्यादा येत आहेत. त्यामुळे फार उंचीवरील केबल्स तोडण्यासाठी म्हैसुरवरुन दोन ड्रोन कटर मागवले आहेत, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
पुणे महापालिकेने १ एप्रिलपासून शहरातील अनधिकृत ओव्हरहेड केबल्स हटवण्याची मोहिम हाती घेतली आहे. सर्वेक्षणात तब्बल ३,६०० किलोमीटर केबल्स नियमबाह्य असल्याचे उघड झाले. नियमांनुसार केवळ भूमिगत केबल टाकण्याची परवानगी असताना, अनेक कंपन्यांनी विद्युत खांब, झाडे, इमारती, पथदिवे यावरुन केबल्स टाकल्याने शहरभर केबल्सचे जाळे पसरले आहे.
नियमानुसार महापालिकेची सशुल्क परवानगी घेऊनच केबल्स टाकल्या जातात. पण, हा नियम मोडून सर्रासपणे अनधिकृत ओव्हरहेड केबल्स टाकल्या गेल्याचे चित्र दिसते. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होऊन महापालिकेचे उत्पन्न बुडत आहे. म्हणून, स्थायी समिती अध्यक्ष भिमाले यांच्या आदेशानुसार विद्युत विभागाकडून अनधिकृत केबल्स काढण्याची मोहिम राबवली जात आहे.