चाकणमध्ये ई-मेल हॅकिंगद्वारे ८.८१ लाखांची फसवणूक
पिंपरी, ता. ७ - आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित ई-मेल संभाषणात अनधिकृतपणे प्रवेश करुन बनावट ई-मेल आयडी तयार करत कंपनीची ८ लाख ८१ हजार ९४२ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार चाकण परिसरात घडला आला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथील एस. के. एस. फास्टनर्स लिमिटेड कंपनीच्या ई-मेल आयडीवरुन व चीनमधील झेझियांग डोंगरुई मशिनरी इंडस्ट्रीज कंपनी लिमिटेडच्या ईमेल आयडीवरुन व्यावसायिक पत्रव्यवहार सुरु होता. दरम्यान, १८ नोव्हेंबर २०२४ ते १८ एप्रिल २०२५ या कालावधीत अज्ञात सायबर चोरट्याने या ई-मेल संभाषणात अनधिकृत प्रवेश मिळवून दोन्ही कंपन्यांशी साधर्म्य असलेले खोटे आणि बनावट ई-मेल आयडी तयार केले.
या बनावट ई-मेलच्या माध्यमातून आरोपीने स्वतःची बनावट कंपनी मूळ कंपनी असल्याचे भासवून एस. के. एस. फास्टनर्स लिमिटेड कंपनीकडून मालाच्या देयकाच्या स्वरूपात वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे पाठविण्यास भाग पाडले. त्यानुसार कंपनीकडून ५२०० आणि ५०४५.७ अमेरिकन डॉलर अशी एकूण ८ लाख ८१ हजार ९४२ रुपयांची रक्कम पाठविण्यात आली. त्यानंतर ही रक्कम अपहार करून फसवणूक केल्याचे उघड झाले.
या प्रकरणी शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी चार वाजता चाकण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३३६ (२), ३४० (२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६ (C) व ६६ (D) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.
-