दारूचे पैसे मागितल्याने तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार

दारूचे पैसे मागितल्याने तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार

चाकण | १३ ऑक्टोबर २०२६ : दारूचे निम्मे पैसे मागितल्यानंतर रागातून एका तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना चाकण परिसरात घडली आहे. या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान संतोषनगर, वाकी गावच्या हद्दीत, ब्रेक्स इंडिया कंपनीसमोरील मोकळ्या जागेत घडली.

या प्रकरणी अनिकेत तानाजी दगडे (वय ३५ वर्षे) यांनी फिर्याद दिली आहे. ते सध्या शिरोली, तालुका खेड, जिल्हा पुणे येथे राहत असून, मूळचे जिल्हा सातारा येथील रहिवासी आहेत. ते खासगी नोकरी करतात.

या प्रकरणात राजू मारुती वाळुंज (वय ३५ वर्षे) आणि गणेश मदन भोर (वय २७ वर्षे) अशी आरोपींची नावे आहेत. दोघेही शिरोली, तालुका खेड येथील रहिवासी असून, दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

फिर्यादीनुसार, अनिकेत दगडे आणि त्यांचे मित्र असलेले दोन्ही आरोपी मोटारसायकलवरून जेवणासाठी जात होते. दरम्यान, झुडपांच्या आडोशाला दारू पीत बसले असताना आरोपी क्रमांक दोन गणेश भोर याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले.

दगडे यांनी जवळील पैसे खर्च झाल्याने पैसे नसल्याचे सांगितले. त्यावरून गणेश भोर याला राग आला. त्याने दगडे यांना धमकावत मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, यावेळी राजू वाळुंज याने जवळील गाडीच्या किचनमध्ये असलेला छोटा चाकू काढून दगडे यांच्या गळ्यावर वार करण्यास सुरुवात केली. दगडे यांनी त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला असता गणेश भोर याने त्यांचे दोन्ही हात पकडले.

त्यानंतर राजू वाळुंज याने पुन्हा चाकूने गळ्यावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७०/२०२६ नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९(१), ३५१(२), ३(५) तसेच भारतीय हत्यार कायद्यातील कलम ३(७) सह ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चाकण उत्तर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories