झोपडपट्टी पुनर्वसन विभागात ‘शून्य कचरा कार्यालय’ उपक्रम सुरू

झोपडपट्टी पुनर्वसन विभागात ‘शून्य कचरा कार्यालय’ उपक्रम सुरू

पिंपरी | १२ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागाच्या चिंचवड येथील मुख्य कार्यालयात ‘शून्य कचरा कार्यालय’ उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि विक्रांत बगाडे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. कार्यालयात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण, पुनर्वापर आणि योग्य विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत काच, रद्दी कागद, धातू, स्वच्छ पॉलिथिन, प्लास्टिक आणि ई-कचरा संकलनासाठी स्वतंत्र डब्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत तयार करण्यासाठी ऑरगॅनिक कंपोस्ट ड्रम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कार्यालयातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होण्यास मदत होणार आहे.

यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम म्हणाले की, वाढत्या शहरीकरणामुळे कचरा व्यवस्थापनाचे आव्हान मोठे होत आहे. प्रत्येक कार्यालयाने स्वतःच्या स्तरावर कचऱ्याचे वर्गीकरण आणि विल्हेवाट लावण्यास सुरुवात केल्यास या समस्येवर मात करण्यास मदत होईल. महापालिकेच्या इतर कार्यालयांमध्येही अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील.

अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी भविष्यात महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये ‘शून्य कचरा’ संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याची सुरुवात मुख्य प्रशासकीय इमारतीपासून करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. कचरा विलगीकरण, पुनर्वापर आणि टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.

उद्घाटनानंतर अतिरिक्त आयुक्तांनी चिंचवड येथील कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्पाला भेट देऊन प्रशिक्षण उपक्रमांचा आढावा घेतला. सध्या शहरात दहा ठिकाणी लाईटहाऊस प्रकल्प कार्यान्वित असून युवकांना विविध अभ्यासक्रमांचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे.

ग्राफिक डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, व्हिडिओ एडिटिंग आणि मोशन ग्राफिक्स यांसारख्या रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांसोबतच परदेशी भाषा आणि आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन प्रशिक्षण देण्याची गरज जंगम यांनी व्यक्त केली.

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रोजगार मिळतो का, याचा दर तीन महिन्यांनी आढावा घेण्याच्या सूचनाही बगाडे यांनी केल्या. तसेच नर्सिंग आणि हॉटेल व्यवसायासारख्या क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन प्रशिक्षणाचे नियोजन करण्यावर भर देण्यात आला.

यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त दशरथ कांबळे, कार्यकारी अभियंता शेखर गुरव, आसरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा अर्चना मोरे, कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्प व्यवस्थापक अमृता बहुलेकर, आयपीसीए प्रतिनिधी दत्ता हेंद्रे, वैभव नसुरडे, आशिष कुंभलकर यांच्यासह महापालिका कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या उपक्रमाचा विस्तार इतर कार्यालयांमध्ये करण्याबरोबरच युवकांना रोजगारक्षम बनविणाऱ्या कौशल्य प्रशिक्षणावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories