पिंपरी | १२ ऑक्टोबर २०२६ : पिंपरीतील आंबेडकर चौकात रिक्षा स्टँडवर गप्पा मारत असलेल्या रिक्षाचालकाला मारहाण करून बर्फ फोडण्याच्या टोच्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात रिक्षाचालकाच्या डाव्या कानाजवळ दुखापत झाली असून, त्याच्या मित्रालाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास जुना मुंबई-पुणे महामार्गावरील आंबेडकर चौकात घडली.
या प्रकरणी विशाल ऊर्फ आण्णा दिलीप धोत्रे (वय ३८ वर्षे) यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात आदनान शरीफ कुरेशी अंजने (वय २५ वर्षे) आणि मुस्तफा ऊर्फ मुसा शरीफ कुरेशी अंजने (वय २२ वर्षे) अशी आरोपींची नावे आहेत. दोघेही पुण्यातील खडकी बाजार परिसरातील रहिवासी आहेत.
फिर्यादीनुसार, विशाल धोत्रे आणि त्यांचा मित्र कैलास हनुमंत म्हेत्रे हे आंबेडकर चौकातील रिक्षा स्टँडवर गप्पा मारत होते. त्यावेळी दोन्ही आरोपी तेथे आले.
यातील मुस्तफा ऊर्फ मुसा कुरेशी याने विशाल धोत्रे यांना त्यांचा भाऊ रिक्षात प्रवासी भरत असल्याच्या कारणावरून जाब विचारला. त्यानंतर शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी देऊन त्याने धोत्रे यांच्या कानशिलात चापट मारली.
त्यानंतर मुस्तफा याने बर्फ फोडण्याचा टोचा काढून विशाल धोत्रे यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केल्याचा आरोप आहे. मात्र, धोत्रे यांनी तो वार चुकवला. या प्रयत्नात टोचा त्यांच्या डाव्या कानाजवळून घासून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, विशाल धोत्रे यांचे मित्र कैलास म्हेत्रे हे वाद सोडवण्यासाठी मध्ये आले. त्यावेळी दुसरा आरोपी आदनान याने कैलास म्हेत्रे यांना धमकावत त्यांच्यावरही बर्फ फोडण्याचा टोचा उगारला. त्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४७/२०२६ नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११५(२), ३(५) तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट कलम ३ आणि ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.