मद्यधुंद पतीची पत्नीला कुकरने मारहाण

मद्यधुंद पतीची पत्नीला कुकरने मारहाण

चाकण | १३ ऑक्टोबर २०२६ : चाकण परिसरातील मेदनकरवाडी येथे दुचाकीची चावी देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला शिवीगाळ आणि दमदाटी करत लोखंडी कुकरने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत ३२ वर्षीय महिलेच्या हाताला दुखापत झाली असून, तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मेदनकरवाडी गावच्या हद्दीतील देवेंद्र रेसिडेन्सी, बंगालवस्ती, बालाजीनगर येथे घडली. या प्रकरणी एका ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. संबंधित महिला सिक्युरिटीच्या नोकरीत कार्यरत आहे. आरोपीचे नाव प्रशांत शंकर भालेराव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपी प्रशांत भालेराव हा किरकोळ घरगुती कारणांवरून महिलेसोबत भांडण करत होता. घटनेच्या दिवशी आरोपी दारू पिऊन घरी आला. त्याने बाहेर जाण्यासाठी मोटारसायकलची चावी मागितली. मात्र, आरोपीने मद्यप्राशन केलेले असल्याने आणि त्याच्या जीवाला धोका होऊ नये या काळजीपोटी फिर्यादी महिलेने दुचाकीची चावी देण्यास नकार दिला. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपीने महिलेला शिवीगाळ आणि दमदाटी केली. त्यानंतर घरात भांडण सुरू असताना त्याने लोखंडी कुकरने महिलेच्या उजव्या हाताच्या मनगटावर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.  या हल्ल्यात महिलेच्या हाताला दुखापत झाली. तसेच आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


आरोपी प्रशांत शंकर भालेराव याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार लोंखंडे करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories