चऱ्होलीत २४० ग्रॅम गांज्यासह एक जण अटकेत
पिंपरी, ता. १२ - चऱ्होली येथील आझादनगर परिसरात सार्वजनिक ठिकाणी गांजा विक्रीसाठी ठेवलेल्या व्यक्तीस पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून २४० ग्रॅम गांजा, मोबाईल व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत दिघी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ) व २९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि.११) पहाटे सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास चैतन्य पान दरबार समोर, आझादनगर, चऱ्होली (ता. हवेली, जि. पुणे) येथे करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राजेंद्र विष्णु आदुडे (वय ३९) असे असून तो सध्या दाभाडे वस्ती, घारे टँकरजवळ, चऱ्होली येथे राहतो. मूळचा तो गजानन नगर, गल्ली क्रमांक १०, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर येथील आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे २२ हजार ८०० रुपयांचा २४० ग्रॅम गांजा, एक मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत सदर गांजा विक्रीसाठी मलकेकर (रा. भाटनगर, पिंपरी) याच्याकडून आणल्याचे आरोपीने सांगितले. त्यामुळे मलकेकर याला या गुन्ह्यात पाहिजे आरोपी करण्यात आले असून त्याचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा पिंपरी-चिंचवड येथील पोलीस शिपाई चंद्रकांत छबू जाधव यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.