ध्रुविता चव्हाणचे राष्ट्रीय स्तरावर सोनेरी यश, १३व्या वर्षी १२ क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी
पिंपरी, ता. १२ - रुपीनगर-निगडी येथील १३ वर्षीय ध्रुविता चव्हाण हिने क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावले आहे. जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर तिने लहान वयात तब्बल १२ विविध क्रीडा प्रकारांमध्ये केलेली चमकदार कामगिरी कौतुकास्पद आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, धैर्य आणि लढाऊ वृत्तीपासून प्रेरणा घेत ध्रुविता सातत्याने क्रीडाक्षेत्रात प्रगती करत आहे. विविध स्पर्धांमध्ये तालुका, जिल्हा परिषद, विभागीय, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर तिने उल्लेखनीय यश मिळवले आहे.
ध्रुविता ही मोरेवस्ती येथील श्रीगणेश व्यायाम मंडळात प्रशिक्षण घेत असून ती सेंट पिटर्स स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. तिचे प्रशिक्षक प्रफुल्ल प्रधान आहेत. सिद्धार्थ फाउंडेशन, पुणे संस्थेची विद्यार्थिनी असलेल्या ध्रुविताने आंतरराष्ट्रीय ऑनलाइन अबॅकस स्पर्धेतही “Champion of Champion” हा किताब जिंकला आहे.
कुटुंबीय, प्रशिक्षक आणि संस्थेच्या पाठिंब्यामुळे ध्रुविताचा क्रीडाप्रवास अधिक उज्ज्वल होत आहे.
ध्रुवीताच्या यशाबद्दल थोडक्यात माहिती.....
- जिल्हा परिषद (Z.P) स्तरावरील यश
कुराश, युनिफाईट आणि शस्त्रांगण मार्शल आर्ट्स या क्रीडा प्रकारांत ध्रुविताने प्रथम क्रमांक मिळवला. मिळवला, तर थाई बॉक्सिंग आणि डॉजबॉलमध्ये तृतीय क्रमांक पटकावला.
- विभागीय आणि राज्य स्तरावरही चमक
विभागीय स्तरावर युनिफाईटमध्ये प्रथम आणि कुराशमध्ये तृतीय क्रमांक मिळवला. राज्यस्तरीय स्पर्धेत युनिफाईटमध्ये प्रथम क्रमांक पटकावत तिने राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
- राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक
राष्ट्रीय स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करत ध्रुविताने युनिफाईट या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले.
- सांघिक खेळांमध्येही सहभाग
सोलो क्रीडा प्रकारांबरोबरच ध्रुविताने रग्बी, कॅरम, शूटिंग बॉल, टेनिक्वेट, लंगडी, टग ऑफ वॉर, कराटे आणि डॉजबॉल यांसारख्या सांघिक खेळांमध्येही सहभाग नोंदवून आपली प्रतिभा सिद्ध केली आहे.
- ध्रुविता शिवकालीन युद्धकला शिकत असून तिला आठ विविध शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण आहे.