news
clock

बलिदानस्मरण दिनानिमित्त वढू बुद्रुक येथे छत्रपती श्री संभाजी महाराजांना अनुयायांचे अभिवादन

पुणे, ता. १९ - छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या ३३७ व्या बलिदानस्मरण दिनानिमित्त वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे बुधवारी (ता. १८) राज्यभरातून आलेल्या अनुयायांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. समाधिस्थळावर हेलिकॉप्टर‌द्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. 

सकाळी जिल्हाधिकारी व शासकीय यंत्रणेच्या वतीने शासकीय पूजा करण्यात आली. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने मूक पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर संग्रामबापू महाराज भंडारे यांचे 'धर्मवीर शंभूछत्रपतींचे बलिदान' या विषयावर कीर्तन झाले. शौर्य पथकाची सशस्त्र मानवंदना झाली.

श्री क्षेत्र वढू बुद्रूक ग्रामपंचायत व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समिती यांच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात सकाळी साडे अकरा वाजता मंत्रोच्चारात हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.

यावेळी, पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप सिंग गिल, अतिरिक्त पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरिक्षक दिपरतन गायकवाड यांच्या आदेशानुसार समाधी स्थळी पोलिसांनी शासकीय मानवंदना दिली. यावेळी झालेल्या धर्मसभेत शंभूराजांच्या वंशज वृषाली राजे भोसले, ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, भाऊ महाराज परांडे यांच्यासह श्री क्षेत्र वढू बुद्रुकचे सरपंच कृष्णा आरगडे, माजी सरपंच अंकुश शिवले, अनिल शिवले, अंजली शिवले, सारिका शिवले, ज्ञानेश्वर भंडारे, ग्रामपंचायत सदस्य व धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीचे कार्यवाह मिलिंद एकबोटे, अध्यक्ष सोमनाथ भंडारे उपस्थित होते.

धर्मसभेत यावर्षीचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मृत्युंजय पुरस्कार आमदार संग्राम जगताप यांना देण्यात आला. ग्रामपंचायतीच्या वतीने स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पुरस्कार आमदार महेश लांडगे यांना तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ पांडुरंग बलकवडे यांना प्रदान करण्यात आला. श्री क्षेत्र मढी देवस्थान कानिफनाथ येथील सरपंच संजय मरकड, पिंपरी चिंचवडचे नगरसेवक नीलेश तरस, राजेंद्र तरस व रोहन माळवदकर यांना छत्रपती संभाजी महाराज शंभूसेवा पुरस्काराने आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज युवा मंचाच्या वतीने शंभूतेज पुरस्काराने पंचायत समिती हवेलीचे सदस्य कुशल सातव यांना गौरवण्यात आले.

इतिहास तज्ज्ञ बलकवडे यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम कथन केला. स्वरा घोरणे या शालेय विद्यार्थिनीने ऐतिहासिक नाटक सादर केले. रात्री 'छावा' या नाट्यप्रयोगाचेही आयोजन करण्यात आले होते. वीर बापुजी शिवले स्मारक मंडळाने प्रसादाचे आयोजन केले होते. धर्मवीर युवा मंचच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. धर्मसभेचे स्वागत सोमनाथ भंडारे यांनी केले. प्रास्ताविक अंकुश शिवले यांनी केले. सूत्रसंचालन अशोक भंडारे यांनी केले.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories