news
clock

घरोघरी गुढी उभारुन शहरवासियांनी केले मराठी नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत

पिंपरी, ता. १९ - घरोघरी गुढी उभारुन शहरवासियांनी गुरुवारी (ता. १९) गुढीपाडवा साजरा केला आणि मराठी नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत केले. सर्वांनी आपल्या नातेवाईकांना अन् मित्रपरिवाराला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 

पहाटेपासूनच घरघरांमध्ये गुढी उभारण्यासाठी तयारी सुरु होती. गुढी उभारण्यासाठी लागणाऱ्या काठ्या, कडूनिंबाची डहाळी आणि इतर पूजासाहित्य खरेदी करण्यासाठी सकाळीही नागरीकांची लगबग सुरु होती. सूर्योदयानंतर सर्वत्र उभारलेल्या गुढ्यांनी वातावरण मंगलमय झाले होते. घरे रांगोळी-तोरणांनी सजवली. बहुतांश कुटुंबांमध्ये सर्वांनाच सुट्टी असल्याने पाहुण्यांचा मेळा जमून गुढीपाडवा साजरा होत होता. घरोघरी गोड जेवणाचा बेत होता, मिठाईच्या दुकानांमध्येही ग्राहकांची गर्दी होती. काहींना गुढीपाडव्यानिमित्त सुट्टी नव्हती त्यांनी नवीन कपडे परिधान करुन आपापल्या कार्यालयात गुढीपाडवा साजरा केला.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नव्या वस्तूंची खरेदी केली जात असल्याने ग्राहकांच्या स्वागतासाठी बाजारपेठा सज्ज होत्या. दुकानांनाही सजावट केली होती. दुकानांमध्ये सवलतीच्या योजना जाहीर केल्या होत्या. बहुसंख्य नागरीकांनी विविध नवीन वस्तूंची खरेदी केली. सृष्टीत चैतन्य निर्माण करणारा गुढीपाडवा शहरात उत्साहात साजरा झाला. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories