काळेवाडी | ८ ऑक्टोबर २०२६ : रहाटणी येथील जमीन खरेदीच्या व्यवहारात एका ३५ वर्षीय महिलेची ८० लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. जमीन खरेदी करून भागीदारी संस्था स्थापन करण्याचे आश्वासन देत पैसे घेतल्यानंतर व्यवहाराची कागदपत्रे न दाखवता संबंधित महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी एका ३५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार समाधान पोपट गेजगे (वय ४०, काशीद पार्क, पिंपळे गुरव, पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १३ जुलै २०२४ पासून सुरू होता. आरोपीने दिनकर बाबुराव जाधव यांच्या मालकीच्या रहाटणी येथील सर्व्हे क्रमांक ७५ आर जमिनीच्या खरेदी व्यवहाराबाबत फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
जमीन खरेदीसाठी १ कोटी ६१ लाख रुपये लागतील, असे सांगून त्यातील निम्मी रक्कम म्हणजेच ८० लाख ५३ हजार रुपये फिर्यादीने द्यावेत आणि उर्वरित रक्कम आपण देऊ, असे आरोपीने सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दोघांच्या सामायिक मालकीमध्ये जमीन खरेदी करून ‘पी व्ही डेव्हलपर्स’ नावाची भागीदारी संस्था स्थापन करण्याचे तसेच बांधकाम करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी आणि त्यांच्या पतीने आरटीजीएस, नेट बँकिंग, आयएमपीएस या माध्यमांतून आरोपीला एकूण ८० लाख ५३ हजार रुपये दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मात्र, त्यानंतर जमीन खरेदीसंदर्भातील कागदपत्रांची मागणी केली असता आरोपीने कोणतीही कागदपत्रे दाखवली नाहीत. पैसे परत मागितल्यावर संबंधित बँक खात्यात रक्कम नसल्याचे माहीत असतानाही धनादेश दिल्याचा तसेच फ्लॅट देण्याचे आश्वासन देऊन वेळकाढूपणा केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२), ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.