चिखलीत कोयता फिरवत दहशत; दुकानदारांना धमक्या, दोघांवर गुन्हा

चिखलीत कोयता फिरवत दहशत; दुकानदारांना धमक्या, दोघांवर गुन्हा

पिंपरी-चिंचवड | १२ ऑक्टोबर २०२६ : चिखलीतील स्पाईन रोड परिसरात दोन जणांनी लोखंडी कोयता हवेत फिरवत दुकानदार आणि नागरिकांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या दहशतीमुळे परिसरातील दुकानदारांनी आपापली दुकाने बंद केली, तर रस्त्यावरील नागरिकांची पळापळ झाल्याचे पोलिसांत दाखल फिर्यादीत नमूद आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १०.४० वाजण्याच्या सुमारास स्पाईन रोड,  सेक्टर क्रमांक १८, चिखली येथे घडली.

या प्रकरणी अरुण ज्ञानेश्वर सावळे (वय ४०, पोलीस हवालदार, बक्कल क्रमांक १८६८, नेमणूक चिखली पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपींमध्ये अनिकेत गणेश देवरे (वय २०, रा. भिमशक्तीनगर, साने पोलीस चौकीजवळ, मोरेवस्ती, चिखली, पुणे) आणि एका विधिसंघर्षित बालकाचा समावेश आहे.

फिर्यादीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी २५ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार ३० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून १३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात शस्त्रे बाळगण्यास मनाई करण्यात आली होती.

असे असतानाही संबंधितांनी या आदेशाचे उल्लंघन करून अवैधरीत्या लोखंडी कोयता बाळगल्याचा आरोप आहे. त्यांनी कोयता जोरजोरात हवेत फिरवत आरडाओरडा केला. तसेच, ‘आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादी कोणी लागले तर आम्ही एकालाही जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी दुकानदारांना आणि रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दहशतीमुळे दुकानदारांनी दुकाने बंद केली आणि रस्त्यावरील लोकांची सैरावैरा पळापळ झाली. मात्र, भीतीमुळे आरोपींना अडवण्यासाठी किंवा तक्रार देण्यासाठी कोणी पुढे आले नाही, असेही फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८१३/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३), १३५ तसेच भारतीय न्याय संहितेतील कलम ३५१ आणि फौजदारी कायदा सुधारणा अधिनियमाच्या कलम ३ व ७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

चिखली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories