news
clock

 चिंचवडमध्ये 'दावत-ए-इफ्तार' कार्यक्रमातून सर्वधर्मसमभावाचा संदेश

पिंपरी, ता. १२ - पवित्र रमजान महिन्यानिमित्त चिंचवडमधील गांधी पेठ येथील आलमगीर मस्जिद परिसरात बुधवारी (ता. ११) सायंकाळी 'दावत-ए-इफ्तार' कार्यक्रमातून सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला गेला. चिंचवड पोलीस ठाणे आणि आलमगीर शाही मस्जिद ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या सुंदर समारंभाचे आयोजन करण्यात आले. 

कार्यक्रमाची सुरुवात मस्जिदचे मौलाना यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी उपस्थितांचे स्वागत करत रमजान महिन्याचे महत्त्व आणि बंधुभाव जपण्याची गरज अधोरेखित केली. यावेळी चिंचवड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चासकर यांनी चिंचवडगाव सर्वधर्मसमभावाचे उत्तम प्रतीक असल्याचे सांगितले. कार्यक्रमात अनंत कोऱ्हाळे, माजी नगरसेवक राजेंद्र गावडे, पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

शांतता समितीचे धनंजय कुलकर्णी यांनी 'चिंचवडनगरीने एकोप्याने आणि सलोख्याने राहण्याचे जे उदाहरण पिंपरी-चिंचवड शहरासमोर ठेवले आहे. ते पुढेही कायम ठेवले जाईल असे सांगितले. सर्व धर्मीय नागरिकांना आमंत्रित करून दावत-ए-इफ्तारचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.'

या प्रसंगी मस्जिदतर्फे उपस्थितांना शाल देऊन सन्मानित करण्यात आले. चिंचवड पोलीस ठाण्याच्या वतीने चासकर आणि जाधव यांनी मस्जिदचे मौलाना यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. मस्जिद ट्रस्टतर्फे इम्रान पानसरे व मीनाजुद्दीन शेख यांनी मुस्लिम बांधव सामाजिक एकता आणि सलोखा टिकवण्यासाठी नेहमीच पोलिसांना सहकार्य करतील, असे आश्वासन दिले. सागर आढारी आणि संतोष उभे यांनी संयोजन केले.

सर्व नागरिकांनी ऐक्य जपावे....

शहरात शांतता व सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन तसेच सर्व नागरिकांनी ऐक्य जपावे. समाज माध्यमावरील अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये. शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्व नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे.

- दत्तात्रेय चासकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चिचवड

सर्वांनी सर्व जाती-धर्मांचा आदर करावा

सर्व जाती धर्माचा आदर राखून शहरात शांततेचे वातावरण टिकवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. कोणत्याही प्रकारच्या जातीय किंवा धार्मिक तणावाला शहरात स्थान दिले जाणार नाही.

- इम्रान पानसरे, आलमगीर शाही मस्जिद ट्रस्ट चिंचवडगाव

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories