मिळकतकर देयके बचतगटातील महिलांमार्फत वितरित केली जाणार
स्थायी समिती सभेत विविध विषयांना मंजूरी
पिंपरी, ता. १२ - मिळकतकराची देयके वाटप करताना नवीन मिळकती शोधणाऱ्या महिलांना मानधन देणे यासह शहरातील जलवाहिन्या, पथदिव्यांची दुरुस्ती व देखभाल; दफनभूमी सुरक्षा नियुक्ती या विविध विषयांना महापालिकेच्या स्थायी समिती सभेने बुधवारी (ता. ११) मंजुरी दिली.
स्थायी समितीची सभा अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसचिव मुकेश कोळप, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे यांच्यासह स्थायी समिती सदस्य व अधिकारी उपस्थित होते. आर्थिक वर्ष २०२६-२७ चे मिळकतकर देयके बचतगटातील महिलांमार्फत वितरित केली जाणार आहेत. त्यादरम्यान नवीन मिळकती शोधल्यास मानधन देण्याचा विषय उपसूचनेद्वारे मंजूर करण्यात आला.
'मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण' योजनेचे अर्ज बचत गटांतील माहिलांमार्फत भरून घेतलेल्या संस्थेस जुलै ते सप्टेंबर २०२४ या कालावधीतील प्रोत्साहन भत्ता देणे, शहरातील पाणी व नद्यांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करणे, घरकुलापासून जाधववाडी पंप हाऊसपर्यंत जलवाहिनी टाकणे, कुदळवाडी एसटीपी ते लक्ष्मी चौकापर्यंत जलवाहिनी टाकणे, विविध विद्युत विषयक कामे करणे, चौकांचे सुशोभीकरण, निगडीत इव्ही चार्जिंग स्टेशन उभारणे, पाण्याच्या टाक्यांची शास्त्रोक्त पद्धतीने साफसफाई व स्वच्छता करणे, भामा आसखेड धरणावरील अशुद्ध जलउपसा केंद्र ते नवलाख उंबरे ब्रेकप्रेशर टाकीपर्यंत १७०० मिलिमीटर व्यासाची आणि चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत १४०० मिलिमीटर व्यासाची वाहिनी टाकणे, नगरसचिव विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांची रजा मंजुरी आदी विषयांना मान्यता देण्यात आली.