स्वच्छ-हरित पिंपरी-चिंचवड घडवण्यासाठी शहरात राबवले जाणार विविध उपक्रम
पिंपरी, ता. २२ - स्वच्छ-हरित पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्याचे निर्देश महापौर रवी लांडगे यांनी महापालिका प्रशासनाला पत्राद्वारे दिले आहेत. महापालिका अधिकारी-कर्मचारी, नागरिक, शाळा, गृहनिर्माण संस्था, उद्योग आणि सामाजिक संघटना यांच्या सक्रिय सहभागातून ही मोहिम राबवली जाणार आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत जीवनशैलीच्या संदेशाला तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांना प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत 'हरित व आत्मनिर्भर शहर' संकल्पना राबवण्यात येत आहे. 'हरित पिंपरी-चिंचवड आठवडा', 'नो पॉवर अवर', 'एक कर्मचारी – एक वृक्ष', 'ई-वाहन आणि चार्जिंग स्टेशन प्रोत्साहन', 'वर्क फ्रॉम होम / व्हर्च्युअल मीटिंग धोरण', 'स्वदेशी बाजार – आत्मनिर्भर पीसीएमसी', 'पेपरलेस प्रशासन', 'ऑईल फ्री हेल्दी कॅन्टीन', 'सौर पिंपरी-चिंचवड', 'ग्रीन रेटिंग स्पर्धा', 'सायकल टू वर्क डे', 'टेरेस गार्डन'. 'नैसर्गिक शेती प्रोत्साहन' यांसारखे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहेत.
महापौर लांडगे म्हणाले, ''ऊर्जा बचत, पर्यावरण संरक्षण आणि स्वदेशीचा संदेश हा केवळ शासनाचा उपक्रम नसून तो लोकचळवळ व्हावी हा आमचा प्रयत्न आहे. पिंपरी-चिंचवड शहर विकासासोबत पर्यावरण संवर्धनातही राज्यात आदर्श निर्माण करेल. या मोहिमेद्वारे शहरात हरित ऊर्जा वापराला चालना मिळणार असून इंधन बचत, प्रदूषण नियंत्रण, वृक्षसंवर्धन, आरोग्यदायी जीवनशैली आणि स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन मिळण्यास मोठी मदत होणार आहे. ''