कंपनीची गोपनीय माहिती प्रतिस्पर्ध्याला पाठवल्याप्रकरणी कामगारावर गुन्हा दाखल
Apr 09 2026
47
कंपनीची गोपनीय माहिती प्रतिस्पर्ध्याला पाठवल्याप्रकरणी कामगारावर गुन्हा दाखल
पिंपरी, ता. ९ - कंपनीची गोपनीय माहिती गैरमार्गाने मिळवून ती प्रतिस्पर्धी कंपनीला पाठवल्याचा प्रकार उत्तर महाळुंगे पोलिस ठण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला केला आहे. आरोपीचा शोध सुरु आहे.
सागर रोहिदास कानवडे (वय ३२, रा. डुडुळगाव, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते १० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी बुधवारी (ता. ८) उत्तर महाळुंगे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आरोपी निखील देवीदास कुटे (वय ३२, मूळ रा. पिंपरी पेंढार, ता. जुन्नर, जि. पुणे) हा फिर्यादीच्या ‘पॅक टाइम’ कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह ऑपरेटर म्हणून काम करत होता. कामाच्या दरम्यान त्याने साक्षीदार नामदेव शेलार यांना फोन करुन मटेरियलमध्ये अडचण असल्याचे सांगितले आणि पर्चेस विभागाच्या ई-मेलमधील माहिती तसेच कच्च्या मालाचे फोटो मागवले. यानंतर आरोपीने कंपनीची नोकरी सोडून उत्तर प्रदेशातील ‘वॉरेन फार्मा’ या प्रतिस्पर्धी कंपनीत नोकरी स्वीकारली. तेथे असताना त्याने आधी मिळवलेले कच्च्या मालाचे फोटो व ई-मेलमधील माहितीचा गैरवापर करुन प्रतिस्पर्धी कंपनीला आर्थिक फायदा करुन देण्याचा प्रयत्न केला. तसेच जर्मनीतील ‘एम.एल. प्लॅस्टिक’कंपनीला ही माहिती पाठवून कच्चा माल मागविल्याचेही समोर आले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२) आणि ३१८(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परदेशी करत असून आरोपीचा शोध सुरु आहे.