क्राइम रिपोर्ट
शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - १८ जुलै २०२६
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
➡️ पत्नीचा मिक्सरच्या वायरने गळा आवळून खून पतीविरुद्ध गुन्हा
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पत्नीने तिचा मिक्सरच्या वायरने गळा आवळून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना चाकण येथील स्वप्ननगरीमागील साईनगरी परिसरात दुपारी ४ च्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी चाकण पोलिसांनी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बडीमा रफिक पठाण (वय २७) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचे वडील मकबुल उस्मान नदाफ (वय ५२, रा. सक्सेस पॉइंटसमोर, वाकी, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. यहुर, ता. सुरपूर, जि. यादगीर, कर्नाटक) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास आरोपी पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन राहत्या घरात मिक्सरच्या वायरने तिचा गळा आवळून खून केला.
या प्रकरणी आरोपी पती रफिक मेहबूब पठाण (वय ३२, रा. साईनगरी, स्वप्ननगरीमागे, समीर अन्सारी यांच्या भाड्याच्या खोलीत, चाकण) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
➡️ जागेच्या वादातून कोयत्याने हल्ला, एक गंभीर जखमी
देहूगावातील विठ्ठलवाडी परिसरात गुरुवारी (ता. १६) जागेच्या वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन एका ४० वर्षीय इसमावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला आहे. तो इसम गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. १७) गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी लक्ष्मण जगताप (वय ४०, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, १६ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आंगणवाडी क्रमांक २ परिसरात हा प्रकार घडला. दोन दिवसांपूर्वी जागेच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून केतुल उर्फ भैया संतोष भोसले, आकाश संतु दुटे, आश्रुबा गायकवाड व छाया संतु दुटे यांनी फिर्यादीवर हल्ला केला.
आरोपी केतुल भोसले याने कारमधून कोयता काढून ''तुला आता खलास करतो'' असे म्हणून जगताप यांना जिवे ठार मारण्याच्या उददेशाने त्यांच्या डोक्यावर वार केले. तसेच आकाश दुटे व आश्रुबा गायकवाड यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जखमी फिर्यादी घराकडे पळत असताना छाया दुटे हिने लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी आरोपींविरोधात देहूरोड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), ११८(२), ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५), आर्म अॅक्ट कलम ४/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७/१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक वाघमारे पुढील तपास करीत आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
➡️ निगडीत खुरप्याने हल्ला, महिलेस गंभीर दुखापत, एकावर गुन्हा
निगडीतील मधुकर पवळे पुलाखालील ट्रॅव्हल्स बुकिंग कार्यालयाजवळ एका महिलेवर लोखंडी खुरप्याने हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी (ता. १६) दुपारी सव्वाचारच्या सुमारास घडली. या प्रकरणी निगडी पोलिसांनी एका ६० वर्षीय व्यक्तीविरुद्ध खुनाचा प्रयत्नासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितेश शांताराम पदमने (वय ३०, रा. प्राधिकरण-निगडी) यांनी तक्रार दिली. पदमने हे त्यांची मैत्रीण सपना म्हस्के हिच्यासह मधुकर पवळे पुलाखालील ट्रॅव्हल्स बुकिंग कार्यालयाजवळ आले होते. त्यावेळी आरोपी ओपन देशा काळे (वय ६०, रा. आझाद चौक, ओटा स्कीम, निगडी) याने त्यांच्याकडे १०० रुपये मागितले. पैसे नसल्याचे सांगितल्याचा राग आल्याने आरोपीने लोखंडी खुरपे आणून "आज तुला सोडत नाही, तुला संपवतो," अशी धमकी देत सपनाच्या डोक्यावर दोन ते तीन वार केले. या हल्ल्यात सपना गंभीर जखमी झाली.
दरम्यान, फिर्यादी नितेश म्हस्के यांनी आरोपीला अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळ दुखापत झाली.
या प्रकरणी आरोपीवर शुक्रवारी (ता. १७) निगडी पोलिस ठाण्यात भा.न्या.सं. कलम १०९ (१), ११८ (१) प्रमाणे नोंदविण्यात आला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
➡️ थेरगावात पत्नीला फावड्याच्या दांडक्याने मारहाण, पतीविरोधात गुन्हा दाखल
थेरगाव येथील गणेश कॉलनी परिसरात पत्नीला फावड्याच्या दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी पतीविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १७ जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास गणेश कॉलनी, थेरगाव, पुणे येथे घडली. फिर्यादी मानसी सचिन लोढे (वय १९, रा. गणेश कॉलनी, थेरगाव) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, आरोपी पती सचिन मच्छिंद्र लोढे (वय २४, रा. गणेश कॉलनी, थेरगाव) याने पत्नी आई-वडिलांकडे का गेली होती या कारणावरून तिच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर फावड्याच्या दांडक्याने तिच्या दोन्ही हातांच्या पोटरीवर, कोपरावर तसेच कानावर मारहाण करून गंभीर दुखापत केली.
या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
➡️ मटका जुगारावर गुन्हे शाखेची कारवाई, चिंचवडमध्ये तिघांवर गुन्हा दाखल, ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त
चिंचवड परिसरातील बिजली नगर येथील नागसेन नगर झोपडपट्टी भागात सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट-१ ने कारवाई केली. या कारवाईत तिघांविरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, ३२ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार शिवराम बाळासाहेब भोपे (ब.नं. १७४६), गुन्हे शाखा युनिट-१, पिंपरी-चिंचवड यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई शुक्रवारी (ता. १७) रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास सर सेनापती बिपीन रावत भुयारी मार्गाशेजारी, नागसेन नगर झोपडपट्टी, बिजली नगर, चिंचवड येथे करण्यात आली. आरोपी मटका जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने छापा टाकला.
या कारवाईत सचिन ज्ञानोबा काळे (वय २५, रा. वेताळ नगर, चिंचवड), महेश रमेश शहा (वय ४८, रा. गुरुनानक कॉलनी, रहाटणी) आणि शंकर सदाशिव मिसाळ (वय ३९, रा. लक्ष्मी निवास, बिजली नगर, चिंचवड) यांच्यावर कारवाई करण्यात आली. आरोपींकडून मुंबई व कल्याण नावाचा मटका जुगार चालविला जात असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
➡️ हिंजवडीत १ लाख ६३ हजार ६८० रुपयांचे अफू व अफूच्या सुकवलेल्या बोंडांचा चुरा जप्त
अंमली पदार्थ विरोधी पथकाने हिंजवडी परिसरात कारवाई करत १ लाख ६३ हजार ६८० रुपयांचे अफू व अफूच्या सुकवलेल्या बोंडांचा चुरा जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून दुचाकी, मोबाईल असा एकूण ६ लाख ६८ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई १६ जुलै रोजी हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मान-हिंजवडी-मानगाव परिसरातील नगरी ढाब्याजवळ, अंबिका प्लायवुड अँड हार्डवेअर दुकानासमोर करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पप्पुराम भारमल चौधरी (वय ४३, रा. राक्षे वस्ती, भरणेचाळ, मानगाव, हिंजवडी, पुणे) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने कारवाई करून त्याच्याकडून एकूण ६ किलो ९९४ ग्रॅम, ५६० मिलीग्रॅम वजनाचा १ लाख ६३ हजार ६८० रुपये किमतीचा अफू व डोडा चुरा जप्त केला.
याशिवाय ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि ५ लाख रुपये किमतीचे वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत आरोपीने हा अंमली पदार्थ राजस्थानमधील नागौर येथील सूर्या हॉटेल परिसरातून एका ओळखीच्या व्यक्तीकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. मात्र त्या व्यक्तीचे नाव व पत्ता पूर्णपणे माहित नसल्याचे त्याने सांगितले.
या प्रकरणी आरोपीविरोधात शुक्रवारी (ता. १७) हिंजवडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार कलम ८ (क), १५ (ब), १७ (ब) व २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.