क्राइम रिपोर्ट - पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - २० जुलै २०२६
--------------------------------------------------------------------------------------------------------------
➡️ हॉटेलमधून घेतलेल्या तंदूरचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन दोन युवकांनी हॉटेलचे मालक, मॅनेजर व हॉटेलमधील कामगारास मारहाण
'हॉटेलमधून घेतलेल्या तंदूरचे पैसे का मागितले' या कारणावरुन दोन युवकांनी हॉटेलचे मालक, मॅनेजर व हॉटेलमधील कामगारांना मारहाण करुन जखमी केले. हॉटेल मालकाला "तू आम्हाला हप्ता दिला नाही तर आम्ही तुला जिवंत सोडणार नाही.", अशी धमकी दिली. ही घटना रविवारी (ता. १९) नढेनगर-काळेवाडी येथील महेश रेस्टॉरंट अॅण्ड बार हॉटेलसमोर घडली.
याबाबत, हॉटेल मालक महेश पोपट नढे (रा. नढेनगर, काळेवाडी) यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रतिक ऊर्फ बब-या गोरख भराटे (वय २३ वर्षे, रा. मिल्ट्रीकॅम्प दिघी) व रोहित मानसिंग राठोड (वय २० वर्षे रा. नढेनगर काळेवाडी) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपींनी फिर्यादी महेश नढे यांच्या हॉटेल मधून तंदुर घेतले असता त्याचे पैसे हॉटेल मॅनेजर अजित पवार याने मगितले. त्यावरुन आरोपींनी त्याला शिवीगाळ केली. तसेच आरोपी प्रतिक फिर्यादीस म्हणाला "तु आम्हाला ओळखत नाही आम्ही आताच जेल मधून सुटून आलो आहे. तुझा मॅनेजर आजा मला तंदुरचे पैसे मागतो काय, तुला हॉटेल चालवायचे असेल तर तु आम्हा दोघांना महिन्याला १०,०००/- रुपये हप्ता दयायचा व आम्ही येईल तेव्हा आम्हाला दारु व जेवण फ्रीमध्ये दयायचे असे तू तुझ्या मॅनेजरला सांगून ठेव, नाहीतर आम्ही तुझे हॉटेल चालून देणार नाही." त्यावेळी फिर्यादी नढे यांनी आरोपीला नकार दिला असता त्या दोघांनी महेश नढे तसेच हॉटेलमधील मॅनेजर व कामगार यांना हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी नढे मध्ये गेले असता आरोपीने सिमेंटचा गट्टू नढे यांच्या डाव्या हाताचे पंजावर मारुन जखमी केले. आरोपी रोहितने नढे यांना "तु आम्हाला हप्ता दिला नाही तर आम्ही तुला जिवंत सोडणार नाही." अशी धमकी दिली आहे.
आरोपींवर काळेवाडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ३०८(२), ३०८ (३), ११५(२), ३५२, ३५१(२) (३), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
➡️ आर्थिक फसवणुकीसाठी स्वतःचे बॅंक खाते उपलब्ध करुन दिल्याप्रकरणी खातेदारांवर गुन्हा दाखल
पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत -
सायबर फसवणुकीच्या प्रकरणात आर्थिक व्यवहारासाठी बँक खाते उपलब्ध करून दिल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध पिंपरी पोलिस ठाण्यात रविवारी (ता. १९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गैरप्रकार दिनांक ४ सप्टेंबर २०२५ ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत घडला आहे.
याबाबत, पिंपरी पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई प्रविण मार्कंडेय दासरी (३५२४) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हेमंत गायकवाड (वय ३३, रा. फ्लॅट क्र. २, शिवशक्ती अपार्टमेंट, अशोक थिएटरजवळ, पिंपरी गाव, पिंपरी) याने स्वतःच्या बॅंक खात्याचा वापर साथीदारांच्या संगनमताने आर्थिक व्यवहारांसाठी केला. ४ सप्टेंबर ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत संबंधित खात्यावर १९ हजार १०० रुपयांचे व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. या व्यवहारांद्वारे देशातील दोन नागरिकांची एकूण १९ हजार १०० रुपयांची फसवणूक झाली आहे.
या प्रकरणी आरोपीवर पिंपरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपास करत आहेत.
सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत -
सायबर फसवणुकीच्या प्रकरणात आर्थिक व्यवहारासाठी बँक खाते उपलब्ध करून दिल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध सांगवी पोलिस ठाण्यात रविवारी (ता. १९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गैरप्रकार दिनांक २०मार्च २०२६ ते १ जुलै २०२६ दरम्यान या कालावधीत घडला आहे.
या प्रकरणी विशाल पोपट कदम (वय ३२, रा. कावेरीनगर, पोलिस लाईन, वाकड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजल संताजी माने (रा. पिंपळे सौदागर) असे आरोपीचे नाव आहे. २० मार्च २०२६ ते १ जुलै २०२६ या कालावधीत आरोपीने स्वतःच्या नावाने आयडीएफसी बँकेत खाते उघडून साथीदारांच्या संगनमताने ते सायबर फसवणुकीसाठी वापरल्याचा आरोप आहे. या खात्यामार्फत सुमारे २ लाख ७५ हजार रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले. तसेच देशातील दोन नागरिकांच्या तक्रारींतील एकूण २ लाख ४९ हजार ८५४ रुपये या खात्यात जमा झाल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध रविवारी (ता. १९) सांगवी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११२(२), ६१(२), ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
➡️ सायबर फसवणुकीच्या उद्देशाने बँक खाते उघडून चौघांची १ लाख २७ हजारांची फसवणूक
संघटित सायबर फसवणुकीच्या उद्देशाने बँक खाते उघडून त्याद्वारे आर्थिक व्यवहार करत देशातील चार नागरिकांची एकूण १ लाख २७ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी एका २६ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल श्रीकांत अंकुश जगताप (वय ३१ वर्षे) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी
विकास गजानन भुजबळ (वय २६, रा. विठ्ठल मंदिर, शिवाजी चौक, पिंपळे निलख) याच्यासह त्याच्या अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने साथीदारांसह संगनमत करून संघटित गुन्हेगारीच्या उद्देशाने आयडीएफसी फर्स्ट बँकेचे खाते उघडले. या खात्यावर एकूण ८ लाख ८८ हजार ३८२ रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. या माध्यमातून भारतातील चार नागरिकांची मिळून १ लाख २७ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे.
आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११२(२), ६१(२), ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० मधील कलम ६६(डी) अंतर्गत वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
➡️ आळंदीत कोयता बाळगणारा तरुण अटकेत
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत लागू असलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या कोयता बाळगणाऱ्या एका तरुणाला आळंदी पोलिसांनी अटक केली.
याबाबत पोलिस शिपाई बाळासाहेब विष्णू खेडकर यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल संतोष हिवाळे (वय २६, रा. वृंदावन कॉलनी, मरकळ रोड, आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे) याला मौजे चऱ्होली येथील बायपास रस्त्यावर प्लुमेरिया मंगल कार्यालयासमोर शनिवारी (दि. १९) दुपारी सुमारे १.५० वाजता ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान आरोपीकडे कोणताही शस्त्र परवाना नसताना सुमारे १८ इंच लांबीचा, १३.५ इंच पाते असलेला व एका बाजूने धार असलेला लोखंडी कोयता (किंमत अंदाजे २०० रुपये) आढळून आला. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांनी जारी केलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध आळंदी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम ४ (२५) तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१)(३) व १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
➡️ चिखलीतील हॉटेलवर छापा; विनापरवाना देशी दारूसाठा जप्त
आळंदी रस्त्यावरील शेलारवस्ती येथील हॉटेल सहारा येथे पोलिसांनी छापा टाकून विनापरवाना विक्रीसाठी ठेवलेला देशी दारूचा साठा जप्त केला. या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्रोव्हिबिशन कायद्याच्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १९) दुपारी सुमारे १२.१५ वाजता हॉटेल सहारा येथे कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी नरेश दाहू दास (वय ३५, रा. हॉटेल सहारा, देहू-आळंदी रोड, शेलारवस्ती, चिखली; मूळ रा. चैनपूर, पोस्ट शीशो, जि. दरभंगा, बिहार) याच्या ताब्यात विनापरवाना विक्रीसाठी ठेवलेल्या ४,५२० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या व ५९० रुपयांची रोख रक्कम, असा एकूण ५,११० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
या प्रकरणी पोलिस हवालदार प्रवीण गंगाराम भोमाळे यांनी फिर्याद दिली असून, चिखली पोलिस ठाण्यात शनिवारी सायंकाळी ४.१३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यात आली आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
➡️ चाकण परिसरातील हॉटेलवर छापा; विनापरवाना देशी दारू जप्त
खेड तालुक्यातील संतोषनगर (भाम गाव) येथे हॉटेल जय मल्हारवर छापा टाकून पोलिसांनी विनापरवाना विक्रीसाठी ठेवलेला देशी दारूचा साठा जप्त केला. या प्रकरणी चाकण उत्तर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. १९) सकाळी सुमारे ११.५० वाजता संतोषनगर ते ठाकूर पिंपरी रस्त्यालगत असलेल्या हॉटेल जय मल्हार येथे कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी दिपक संपत शिंदे (वय २२, रा. निमगाव खंडोबा, ता. खेड, जि. पुणे) याच्या ताब्यात विक्रीसाठी ठेवलेली ३,२०० रुपयांची 'पॉवर लाईम पंच' कंपनीची देशी दारू आढळून आली.
या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट-३, पिंपरी-चिंचवड येथील पोलिस शिपाई प्रदीप अरुण राळे यांनी फिर्याद दिली आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
➡️ दिघीत विनापरवाना विदेशी दारूसाठा जप्त; एकावर गुन्हा
दिघी येथील खंडोबा मंदिर परिसरात पोलिसांनी कारवाई करून विनापरवाना विक्रीसाठी ठेवलेला विदेशी दारूसाठा जप्त केला. या प्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमाच्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. १९) रात्री सुमारे ७.२५ वाजता खंडोबा मंदिर, दिघी येथे ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी वैभव आदिकराव भिसे (वय ३०, रा. चौधरी पार्क, लेन नं. २, दिघी, ता. हवेली, जि. पुणे; मूळ रा. तारुख, ता. कराड, जि. सातारा) याच्या ताब्यात विक्रीसाठी ठेवलेला १६ हजार ५०० रुपयांचा विदेशी दारूसाठा आढळून आला.
याप्रकरणी पोलिस शिपाई उमेश दिलीप कसबे (वय २८, दिघी पोलिस ठाणे) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार दिघी पोलिस ठाण्यात रविवारी रात्री १०.५८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
➡️ संत तुकारामनगरमध्ये बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्यावर कारवाई
संत तुकारामनगर पोलिसांनी यशवंतराव चव्हाण रस्त्यावर सिल्वर ओक इमारतीजवळ कारवाई करून बेकायदा देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले. ही कारवाई १९ जुलै रोजी रात्री साडेसातच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजकुमार ऊर्फ हनुमंत लिंगप्पा बेंगार (वय ३०, रा. रेल्वेगेटजवळ, जवळकर चाळ, कासारवाडी, पुणे) हा टीव्हीएस ज्युपिटर मोपेड (क्र. एमएच १४ एचटी ४५४६) वरून देशी दारूची वाहतूक करताना आढळून आला.
त्याच्याकडून ८ हजार रुपये किमतीच्या ‘पॉवर लाईम पंच’ देशी दारूच्या २०० सिलबंद बाटल्या तसेच ६० हजार रुपये किमतीची मोपेड असा एकूण ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीकडे दारू वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५ (३७)(१)(२) व ७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला बीएनएसएस कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस शिपाई वैभव दत्तात्रय सोन्ने यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
➡️ रावेतमध्ये बेकायदा दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई, ६ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त
हॉटेल राजयोगच्या मागील बाजूस असलेल्या पत्राशेडमध्ये बेकायदा दारू विक्री करणाऱ्या तरुणावर दारूबंदी पथकाने कारवाई केली. या कारवाईत देशी व विदेशी दारूसह एकूण ६ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल यशवंत डांगे (वय २७, रा. शंकरविश्व बिल्डिंग, फुलजाई कॉलनी, शिंदेवस्ती, हवेली, पुणे) हा म्हस्के वस्ती, रावेत येथील हॉटेल राजयोगच्या मागील बाजूस असलेल्या पत्राशेडमध्ये विनापरवाना दारू विक्री करत असल्याचे आढळून आले.
दारूबंदी पथकाचे पोलीस कर्मचारी शामसुंदर वैजनाथ गुट्टे (वय ३८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडून पॉवर लाईम पंच देशी दारू तसेच ऑरेंज सिटी व्हिस्की कंपनीची विदेशी दारू असा ६ हजार ४४० रुपयांचा प्रोव्हिजन माल जप्त करण्यात आला.
आरोपीविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
➡️ आकुर्डीत बेकायदा देशी दारू विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल
आकुर्डी येथील खंडोबा माळ चौक परिसरात टपरीच्या आडोशाला विनापरवाना देशी दारू विक्री करणाऱ्या तरुणावर निगडी पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १९ जुलै २०२६ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास खंडोबा माळ चौक, आकुर्डी येथे घडली. आरोपी सुरज प्रल्हाद काशिदे (वय २६, रा. शारदा कॉलनी अपार्टमेंट, रमाबाईनगर झोपडपट्टी, बुद्धविहार परिसर, पिंपरी) हा टपरीच्या आडोशाला देशी दारूची बेकायदा विक्री करताना आढळून आला.
त्याच्याकडून ४४० रुपये किमतीची देशी दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी पोलीस शिपाई दीपक गुणवंत पिसे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाई सुरू आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------