क्राईम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - ३ जुलै
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
👮♀️ - काळेवाडीत हॉटेलचे कुलूप तोडून रोख रक्कमेची चोरी, आरोपी अटक
पिंपरी, ता. ३ जुलै २०२६ - हॉटेलच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून हॉटेलमध्ये प्रवेश करुन गल्ला व कपाटातील एकूण ६० हजार रुपयांची रक्कम चोरीला गेली आहे. ही चोरी २९ ते ३० जून दरम्यान सकाळी साडेदहाच्या सुमारास ज्योतिबानगर-काळेवाडी येथील शिवकल्याण भोजनालयात झाली आहे. पोलिसांनी चोरट्याला शोधून अटक केली आहे.
याबाबत, हॉटेलचे मालक आधिकराव विश्वासराव भोसले (वय ५३ वर्षे, रा. ज्योतिबा नगर, काळेवाडी) यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. २९ ते ३० जून दरम्यान अज्ञात इसमाने फिर्यादी भोसले यांच्या शिवकल्याण भोजनालयाच्या पाठीमागील दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश करुन कपाटातील रोख रक्कम व गल्ल्यातील अशी अंदाजे एकूण ६०,०००/- ची रोख रक्कम चोरुन नेली होती. पोलिसांनी शोध घेतला असता जगतापनगर-थेरगाव येथील शंकर सोपान सगर (वय १८ वर्षे रा. भोरडे बिल्डींग, रुम नं.६, जगताप नगर, थेरगाव) याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपी शंकर सगर याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध काळेवाडी पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. २) गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
👮♀️ - तळेगाव एमआयडीसीत पेट्रोल पंपावर २५ लाखांचा अपहार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
पिंपरी, ता. ३ जुलै २०२६ - पेट्रोल पंपावर 'यूपीआय'द्वारे जमा झालेले पैसे स्वतःच्या व इतर कामगारांच्या खात्यावर पाठवून अंदाजे २५ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीचा हा प्रकार १ एप्रिल २०२५ ते २२ मे २०२५ या कालावधीत मावळ तालुक्यातील आदित्य पेट्रोल पंपावर घडला आहे.
याबाबत, संजय रमेश बावीसकर (रा. तळेगाव दाभाडे ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींची नावे १) धर्मेंद्र रामाश्रय पांडे (रा. झारखंड), २) विजय बाबुराव त्रिभुवन (रा. वराळे, ता. मावळ) व ३) चैतन्य विठ्ठल चांदेकर (रा. तळेगाव दाभाडे अशी आहेत. दिनांक १ एप्रिल २०२५ ते २२ मे २०२५ या कालावधीत आरोपींनी फिर्यादी बावीसकर यांचा विश्वास संपादन करून पेट्रोल व डिझेल विक्रीतील रक्कम यूपीआयच्या माध्यमातून स्वतःच्या तसेच इतर कामगारांच्या बँक खात्यांवर वळवून अंदाजे २५ लाख रुपयांचा अपहार केला आहे. तसेच स्टॉक रजिस्टरमध्ये खोटे हिशोब नोंदवून आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी आरोपींवर गुरुवारी (ता. २) तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहीता २०२३ कलम ३१८ (४), ३१६(२), ३ (५) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
👮♀️ - महिलेच्या छातीवर चाकूने वार, आरोपीवर गुन्हा
पिंपरी, ता. ३ जुलै २०२६ - सोबत राहात नसल्याच्या कारणावरुन महिलेच्या छातीवर चाकूने मारुन करुन तिला तरुणाने जखमी केले. ही घटना खेड तालुक्यातील मौजे आंबेठाण गावच्या हद्दीत १ जुलैला दुपारी १ च्या सुमारास घडली आहे.
याबाबत, महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे. आरोपी चांगदेव नागनाथ मुंडे (वय ३० वर्षे, रा. जि. बीड) याच्यावर गुरुवारी (ता. २) उत्तर महाळुंगे एम.आय.डी.सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व आरोपी हे दोन वर्षापासून एकत्र राहत आहेत. आरोपीपासून फिर्यादी महिलेस मुलगी झाली आहे. आरोपी हा एक महिन्यापासून दारु पिवून फिर्यादी महिलेस मारहाण करीत असल्याने, ती महिला आरोपीपासून वेगळे राहत आहे.
१ जुलैला आरोपी मौजे आंबेठाण येथे चाकू घेऊन आला. एकत्र राहत नसल्याचे कारणावरुन त्याने फिर्यादी महिलेच्या छातीवर चाकूने मारले आणि त्यांची मुलगी स्वरा हीस सोबत घेऊन गेला. मारहाणीत महिला जखमी झाली आहे. उत्तर महाळुंगे एम.आय.डी.सी पोलिस ठाण्यात बी.एन.एस. ११५ (२), ११८(१), ३५२ ३२४ ३२३ ५०६ आरोपीवर या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
👮♀️ - भोसरी येथे ट्रॅव्हल्स वाहनातून बॅटरी व स्टेपनी चोरी, दोन आरोपी अटक
पिंपरी, ता. ३ जुलै २०२६ - भोसरी येथील बाबर पेट्रोल पंपाच्या मागील ट्रॅव्हर्ल्स गाडी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनातून बॅटरी व स्टेपनी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ही घटना दिनांक १ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४.०० ते ५.३० या वेळेत घडल्याचे फिर्यादी दादासाहेब गिनानदेव ढाकणे (वय ४८, रा. धावडे वस्ती, भोसरी, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. ढाकणे हे चालक म्हणून कार्यरत आहेत. फिर्यादी यांच्या ताब्यातील ट्रॅव्हर्ल्स गाडी बाबर पेट्रोल पंपामागील पार्किंगमध्ये उभी असताना अज्ञात व्यक्तींनी वाहनातील बॅटरी व स्टेपनी असा अंदाजे ४५,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम 303(2), 3(5) तसेच भारतीय दंड विधान कलम 379, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ तपास करून लखन गौतम चौधरी (वय ३० वर्षे, रा. पारोळा, जि. जळगाव) आणि विजय प्रकाश कोळी (वय ४३ वर्षे, रा. आसोदा, ता. जळगाव) या दोघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
👮♀️ - आळंदी येथे घरातून ८ लाखांचे सोन्याचे दागिने चोरी, एका आरोपीला अटक
पिंपरी, ता. ३ जुलै २०२६ - माउली मंदिराजवळील साळी धर्मशाळेसमोर असलेल्या एका घरातून सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका महिलेला अटक करण्यात आली आहे. ही घटना दिनांक १ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत घडली. फिर्यादी सौ. लता अंकुश चौधरी (वय ६५, रा. ता. खेड) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीच्या राहत्या घरात प्रवेश करून हँडबॅगमधील पर्समधून सुमारे ८ लाख १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात व्यक्तीने चोरी करून नेले. या प्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम 306 तसेच भा.दं.वि. कलम 381 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी तपासादरम्यान शिवानी निलेश जाधव (वय २३, रा. वहिले आळी, आळंदी, ता. खेड, जि. पुणे) हिला अटक केली आहे. पुढील तपास करीत आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
👮♀️ - महाळुंगे एमआयडीसीत कंपनीतून २ लाखांच्या कॉपर कॉईलची चोरी
पिंपरी, ता. ३ जुलै २०२६ - उत्तर महाळुंगे एमआयडीसी हद्दीत असलेल्या जी.ई. एरोस्पेस कंपनीतून सुमारे २ लाख रुपये किमतीचे कॉपर कॉईल चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे.
ही घटना दिनांक २१ मे २०२६ रोजी रात्री ८.३० वा. आणि दिनांक ३१ मे २०२६ रोजी रात्री ७.१५ वा. च्या सुमारास वासुली (ता. खेड) येथील कंपनी परिसरात घडली. या प्रकरणी गुरुवारी (ता. २) आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी चंद्रशेखरराव सत्यनारायण सामासानी (वय ३६, रा. डेस्टीनेशन ऑस्टीया बिल्डिंग, मोशी, पुणे; मूळ रा. अमलापुरम, आंध्र प्रदेश) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने कंपनीतील सुमारे २० कॉपर कॉईल (४५ कि.ग्रॅ., ३८ कि.ग्रॅ., ९ कि.ग्रॅ. वजनाच्या) एकूण अंदाजे २ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरी करुन नेला.
या प्रकरणी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम 305(अ) तसेच भा.दं.वि. कलम 380 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी अब्दुल अहद अन्सारी (वय ३२, रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी, पुणे; मूळ रा. हजारीबाग, झारखंड) यास अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------