क्राईम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
➡️ थेरगावमध्ये कोयत्यासह २० वर्षीय युवक पोलिसांच्या ताब्यात
पिंपरी, ता. ७ जुलै २०२६ - शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून धारदार कोयता बाळगणाऱ्या एका २० वर्षीय युवकाला गुन्हे शाखा, युनिट-२ च्या पथकाने सोमवारी (ता. ६) थेरगाव येथून ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात काळेवाडी पोलिस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपीचे नाव समीर शराफत उस्मानी (वय २०, रा. जगतापनगरजवळ, थेरगाव) असे आहे. याला सोमवारी (ता. ६) सायंकाळी साडेचारच्या सुमारास काळेवाडी स्मशानभूमीजवळ ताब्यात घेतले. आरोपीकडे एक धारदार लोखंडी कोयता आढळून आला. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांनी २४ जून ते ७ जुलै २०२६ या कालावधीत महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या कलम ३७(१)(३) अन्वये शस्त्रे व घातक वस्तू बाळगण्यास बंदीचा आदेश जारी केला होता. या आदेशाचे उल्लंघन करुन गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशान लोखंडी धारदार कोयता जवळ बाळगला होता. पोलिसांनी कोयता जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार तुषार अशोक शेटे (गुन्हे शाखा, युनिट-२) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीवर काळेवाडी पोलिस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम, १९५९ च्या कलम ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७(१)(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
➡️ खेड तालुक्यातील निघोजे येथून ८० हजारांची दुचाकी चोरीला
पिंपरी, ता. ७ जुलै २०२६ - खेड तालुक्यातील निघोजे गावाच्या हद्दीतील हॉटेल शिवतेज येथून ८० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शनिवारी (ता. ५) सायंकाळी घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन विष्णू दिवटे (वय २१, व्यवसाय – चालक, रा. कडवस्ती, कुरूळी, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी (ता. ५) सायंकाळी ७ ते ८.१५ वाजण्याच्या सुमारास निघोजे गावाच्या हद्दीतील हॉटेल शिवतेज येथून त्यांच्या मालकीची ८० हजार रुपये किमतीची टीव्हीएस रायडर (क्र. एमएच २१ सीएल ०६८७) ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. ६) भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमान्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
➡️ मोशीतील दोन दुकाने फोडून ४१ हजारांची रोकड लंपास
पिंपरी, ता. ७ जुलै २०२६ - मोशी येथील बोऱ्हाडेवाडी परिसरात एका रात्रीत दोन दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी एकूण ४१ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना सोमवारी (ता. ६) पहाटे घडली. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रदीप सुरेश शेळके (वय ५२, रा. स्वप्नपूर्ती हाऊसिंग सोसायटी, बोराडेवाडी, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींची नावे विश्वजीत बाळासाहेब जाधव (वय १९), विवेक विनोद राम (वय १९) आणि यश पवार (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) अशी आहेत.
सोमवारी (ता. ६) पहाटे २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान आरोपींनी शेळके यांच्या रिद्धी सिद्धी ट्रेडिंग कंपनी तसेच काही अंतरावरील कृष्णाई दूध डेअरी या दुकानांचे शटर उचकटून आत प्रवेश केला. रिद्धी सिद्धी ट्रेडिंग कंपनीच्या काउंटरमधील ड्रॉवरमधून ११ हजार रुपये, तर कृष्णाई दूध डेअरीच्या काउंटरमधील रोकड असे मिळून एकूण ४१ हजार रुपयांची चोरी करून आरोपी पसार झाले. आरोपींविरुद्ध एम आय डी सी भोसरी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०५, ३३१(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.