पिंपरी-चिंचवड | 8 सप्टेंबर 2026 : चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर तिकीट, हॉटेल आणि टूर पॅकेजच्या ऑनलाइन बुकिंगच्या नावाखाली होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केले आहे. अधिकृत वेबसाइटसारख्या दिसणाऱ्या बनावट वेबसाइट, सोशल मीडिया जाहिराती आणि अनोळखी लिंकच्या माध्यमातून भाविकांची आर्थिक फसवणूक होण्याचा धोका असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा सुरू असून देशभरातून मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या तीर्थस्थळांना भेट देत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक नागरिकही या यात्रेसाठी जात असल्याने सायबर पोलिसांनी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सायबर गुन्हेगारांकडून हेलिकॉप्टर सेवा, हॉटेल बुकिंग आणि टूर-ट्रॅव्हल पॅकेजच्या नावाखाली आकर्षक जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात. अधिकृत संकेतस्थळाप्रमाणे दिसणाऱ्या बनावट वेबसाइट आणि लिंक तयार करून कमी दरातील तिकिटे किंवा विशेष पॅकेजचे आमिष दाखवले जाते. त्यानंतर बुकिंगच्या बहाण्याने ऑनलाइन पैसे स्वीकारून नागरिकांची फसवणूक केली जाते.
चारधाम हेलिकॉप्टर बुकिंगसाठी नागरिकांनी केवळ https://heliyatra.irctc.co.in या अधिकृत वेबसाइटचा वापर करावा. Google, सोशल मीडिया किंवा अन्य सर्च इंजिनवर दिसणाऱ्या अनोळखी वेबसाइट अथवा लिंकवर तात्काळ विश्वास ठेवू नये. अनोळखी व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकावर किंवा वैयक्तिक बँक खात्यावर पैसे पाठवू नयेत.
चारधाम यात्रेची नोंदणी आणि अधिकृत माहितीसाठी उत्तराखंड राज्य पर्यटन विभागाने जारी केलेल्या +91-8394833833 या WhatsApp क्रमांकाचा वापर करता येईल. या क्रमांकावर “Yatra” असा संदेश पाठवल्यानंतर नोंदणीसह आवश्यक माहिती मिळू शकते.
कोणत्याही वेबसाइटवर ऑनलाइन पेमेंट करण्यापूर्वी तिचा URL, सत्यता आणि संबंधित सेवा प्रदात्याची अधिकृतता तपासावी. कोणालाही OTP, बँक खाते क्रमांक, ATM कार्डची माहिती, CVV किंवा UPI PIN देऊ नये.
ऑनलाइन फसवणूक झाल्यास किंवा संशयास्पद व्यवहार आढळल्यास तातडीने 1930 या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा अथवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार यांनी केले आहे.