पिंपरी-चिंचवड | 8 सप्टेंबर 2026 : महापालिकेची पूर्वपरवानगी न घेता चोवीसावडीतील काळीभिंत रोड परिसरात उभारण्यात आलेला 30×30 फुटांचा अनधिकृत जाहिरात फलक लोखंडी स्ट्रक्चरसह निष्कासित करण्यात आला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने ही कारवाई केली.
महापालिकेच्या प्रेसनोटनुसार, सर्व्हे क्रमांक 175/9, काळीभिंत रोड, चोवीसावाडी, पुणे येथे विनापरवाना जाहिरात फलक उभारण्यात आल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले. त्यानंतर उपायुक्त (परवाना) राजेश आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित फलक लोखंडी स्ट्रक्चरसह हटवण्यात आला.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील नियम 244 आणि 245 तसेच महाराष्ट्र महानगरपालिका (आकाशचिन्ह व स्कायसाईन) आणि जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन व नियंत्रण नियम, 2022 मधील तरतुदींनुसार खासगी जागेवर जाहिरात फलक उभारण्यासाठीही महापालिकेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे.
पिंपरी-चिंचवडची देशपातळीवर औद्योगिक शहर म्हणून ओळख आहे. शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असताना विनापरवाना उभारण्यात येणाऱ्या जाहिरात फलकांमुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. त्यासोबतच महापालिकेच्या जाहिरात परवाना शुल्कातून मिळणाऱ्या महसुलातही घट होत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
शहराचे सौंदर्य अबाधित ठेवणे आणि महापालिकेच्या महसुलात वाढ करणे या उद्देशाने आकाशचिन्ह व परवाना विभागाने अनधिकृत फलकांची स्थळपाहणी करून ते तातडीने हटवण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत मागील महिन्यात ताथवडे, थरमॅक्स चौक आणि समर्थ सहकारी बँकेच्या इमारतीवरील अनधिकृत जाहिरात फलकही निष्कासित करण्यात आले.
शहरातील जाहिरात एजन्सींनी महापालिकेची आवश्यक परवानगी घेतल्याशिवाय कोणताही जाहिरात फलक उभारू नये. विनापरवाना फलक आढळल्यास तो महापालिकेकडून तात्काळ निष्कासित करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही आकाशचिन्ह व परवाना विभागाने दिला आहे.