कोयत्याचा धाक दाखवून वाहनचालकास धमकावणाऱ्या युवकाला अटक
पिंपरी, ता. १६ : फुगेवाडी परिसरात कारमध्ये कोयता बाळगून रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वारांना धमकावणाऱ्या तरुणाला दापोडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवारी (ता. १४) दुपारी करण्यात आली.
मानव भिमराव पंडीत (वय २१, रा. प्रगती-पुजा अपार्टमेंट, स्पाईन रोड, मोशी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार भुपेंद्र खंडू चौधरी यांनी दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास बजाज चेतक शोरुमशेजारी, ग्रेड सेपरेटरजवळील सार्वजनिक रस्त्यावर आरोपी हा काळ्या रंगाच्या महिंद्रा थार गाडीतून फिरत होता. त्यावेळी त्याच्याकडे सुमारे ५०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता आढळून आला. आरोपीने रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वारास धमकावले.
याप्रकरणी भारतीय हत्यार अधिनियम कलम ४ (२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दापोडी पोलिस करीत आहेत.